घटस्थापना : आज घटस्थापना नवरात्रौत्सवास प्रारंभ; | पुढारी

घटस्थापना : आज घटस्थापना नवरात्रौत्सवास प्रारंभ;

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

चैतन्यदायी, मंगलमय शारदीय नवरात्रौत्सवास ( घटस्थापना ) गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. पारंपरिक पद्धतीने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मानाच्या तोफेची सलामी झाल्यानंतर करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, नवदुर्गा, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरासह शहरातील विविध मंदिरे आणि घराघरांत पारंपरिक धार्मिक विधींसह घटस्थापना करण्यात येणार आहे.

दरम्यान, देवी दर्शनाच्या ई-पासकरिता पहिल्याच दिवशी 25,732 भाविकांनी नोंद केली आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारी मंदिरे गुरुवारपासून दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती वर्तवली जात असल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आली आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात पहाटे धार्मिक विधी होणार असून, सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना केली जाणार आहे. यानंतर आरती, साडेअकरा वाजता पंचांमृत अभिषेक व दुपारी दोन वाजता आरती होणार आहे. यानंतर देवीची अलंकारिक पूजा बांधली जाणार आहे. जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरातही पहाटे 5 वाजता देवीला अभिषेक होणार आहे. घरोघरीही घटस्थापनेने नवरात्रौत्सवास सुरुवात होत आहे. यामुळे सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नवरात्रौत्सवानिमित्त मंदिर विविधरंगी नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळवण्यात आले आहे. देवीची दररोज विविध रूपांत पूजा बांधण्यात येणार आहे. दररोजची पूजा व धार्मिक विधी भाविकांना पाहता यावेत, यासाठी शहरात ठिकठिकाणी भव्य एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय ई-पासद्वारे दर्शनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दरम्यान, नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला श्री अंबाबाईची पारंपरिक पद्धतीने पूजा बांधण्यात आली होती.

दर्शन वेळ पहाटे 5 ते रात्री 9 ( घटस्थापना )

नवरात्रौत्सव काळात 14 ऑक्टोबर (खंडेनवमी) हा दिवस वगळता मंदिर दि. 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार आहे. गुरुवार, दि. 14 रोजी मंदिर सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दर्शनासाठी सुरू राहील. भाविकांना ई-दर्शन पासद्वारे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाई देवस्थानच्या वतीने ई-दर्शन पास पास ुुु.ारहरश्ररुाळज्ञेश्रहर्रिीी.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मंदिरात फुले-फळे-पानांची आकर्षक सजावट ( घटस्थापना )

दरम्यान, बुधवारी मंदिरात फुले-फळे-पानांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 45 कारागिरांनी 24 तासांत ही सजावट केली आहे. यासाठी 5 हजार गुलाब, 2 हजार लिली, 2 हजार कार्नेशन, 1 हजार अ‍ॅथुरियम फुलांसह 1,500 किलो शेवंती, 2 हजार किलो झेंडू, 1 हजार किलो हिरवी पाने या फुला-पानांसह 50 डझन सफरचंद, 50 डझन डाळिंब, 50 डझन मोसंबी, 30 डझन अननस या फळांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ही सजावट लक्षवेधी व आकर्षक बनली आहे. एनर्जी इव्हेंटचे स्वप्निल सुभाष हिडदुगी यांच्या वतीने सेवा म्हणून ही सजावट करण्यात आली आहे. पुढील चार दिवस ही सजावट भाविकांना पाहता येणार आहे.

दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त ( घटस्थापना )

पुणे : शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून (दि. 7) मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. पहाटे पाचपासून ते दुपारी एक वाजून 45 मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. या वेळेत घटस्थापना करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. 10 ऑक्टोबरला रविवारी ललिता पंचमी आहे. 12 ऑक्टोबरला महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे.

13 ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास आहे, तर 14 ऑक्टोबरला गुरुवारी नवरात्रौत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे. दुसर्‍या दिवशी 15 तारखेला दसरा आहे, असे त्यांनी सांगितले.

Back to top button