राजाराम कारखाना निवडणूक : विद्यमान संचालकांसह 17 उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

राजाराम कारखाना निवडणूक : विद्यमान संचालकांसह 17 उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सत्तेज पाटील विरुद्ध महाडिक गटाच्या तीव्र राजकीय संघर्षाची चुणूक छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासूनच दिसत आहे. सोमवारी पहिल्या दिवशी 216 इच्छुकांनी अर्ज नेले तर 17 अर्ज दाखल झाले. पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पहिल्या दिवसापासून असलेला कडेकोट पोलिस बंदोबस्त चर्चेचा विषय ठरला.

ज्यांना निवडणूक लढवावयाची आहे, त्या उमेदवारांनाच अर्ज भरण्यासाठी कार्यालयात प्रवेश देण्याचा फतवा निवडणूक विभागाने काढला आहे. पहिल्या दिवशी माजी आ. महादेवराव महाडिक, अमल महाडिक, चेअरमन दिलीप पाटील, माजी चेअरमन सर्जेराव माने, दिलीप उलपे हे पाच विद्यमान संचालक व माजी संचालक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भू विकास बँकेच्या कार्यालयात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. गटनिहाय अर्ज भरून घेण्यात येत आहेत.

अर्ज दाखल केलेल्यांमध्ये माजी संचालक शिवाजी रामा पाटील, सर्जेराव भंडारे, मारुती कीडगावकर यांचा समावेश आहे. गतवेळच्या निवडणुकीत विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बाबुराव दादू बेनाडे, किरण बाबासो भोसले, शिवाजी ज्ञानू किबिले यांनी यावेळीही विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर वरिष्ठ सहायक निबंधक प्रदीप मालगावे व अमित गराडे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

Back to top button