कोल्हापूर : अंजली-नंदिनीच्या गीतांची ‘चैत्रपालवी’ आज बहरणार | पुढारी

कोल्हापूर : अंजली-नंदिनीच्या गीतांची ‘चैत्रपालवी’ आज बहरणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा, मराठी मनाचा असा संदेश घेऊन येणार्‍या गुढीपाडव्याच्या सणाची चाहूल सर्वांनाच लागली आहे. अशा नव आशेची नवजीवनाची सुरुवात अविस्मरणीय करण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘चैत्रपालवी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रखरखत्या उन्हात मनाला गारवादायी पालवीसारखा हर्षोल्हासात अन् दिमाखात हा बहारदार गीतांचा कार्यक्रम साजरा होणार आहे.

आज दि. 21 रोजी दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात लिटील चॅम्पची विजेती गायिका अंजली गायकवाड, मराठी रियालिटी शो संगीत सम्राट सीझन-1 ची विजेती नंदिनी गायकवाड यांच्या सुश्राव्य गीतांचे तसेच जीवनगाणे वाद्यवृंद यांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमासाठी आयकॉन स्टिल यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.

आपल्या सुरेल आवाजाची चुणूक दाखवत अंजलीने अल्पावधीतच सर्वांची मने जिंकली आहेत. घरातूनच वडिलांच्या रूपात लाभलेल्या गुरूंकडून संगीताचे बाळकडू अंजली आणि नंदिनी या दोघी बहिणींना लहानपणापसूनच मिळाले. आपल्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या बहिणीच्या पावलांवर पाऊल टाकत संगीतक्षेत्रात तिने पर्दापण केले आहे. अनोख्या गायनातून अल्पावधीत कलारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या गायकवाड भगिनी कोल्हापूरकरांनाही मंत्रमुग्ध करण्यासाठी येत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9404077990.

Back to top button