हद्दवाढ : मुख्यमंत्र्यांसोबत तत्काळ बैठक घ्या | पुढारी

हद्दवाढ : मुख्यमंत्र्यांसोबत तत्काळ बैठक घ्या

कोल्हापूर : हद्दवाढीसंदर्भात तातडीने मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

हद्दवाढीसाठी आणखी किती दिवस आंदोलन करायचे, असा सवाल करून माजी महापौर आर. के. पोवार यांनी आता आम्हाला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना स्वत:हून हद्दवाढीसंदर्भात प्रस्ताव मागवला आहे. त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपण अभ्यास करून बैठक घेऊन मार्ग काढू, असे आश्वासन दिले. मात्र, त्यांनी बैठक घेतलीच नाही. आंदोलनाचा इशारा देताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले. बैठक घेतली मात्र या बैठकीत हद्दवाढ समर्थक व विरोधक यांना समोरासमोर आणून भांडण लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केला.

आमदार जयश्री जाधव यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री अथवा पालकमंत्र्यांनी उत्तर न देता उद्योगमंत्र्यांनी उत्तर दिले, तेही चुकीचे उत्तर दिल्याचा आरोप करून इंदुलकर यांनी आता महापालिकेची निवडणूक नसताना निवडणुकीमुळे हद्दवाढ होऊ शकत नाही, असे उत्तर देऊन जनतेची दिशाभूल केल्याचे सांगितले.

पंचगंगा नदीकाठी कार्यक्रमाद्वारे शाहू महाराज यांच्या विचारांचा इतिहास संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून दिलीप देसाई म्हणाले, कणेरी मठाच्या कार्यक्रमात वापरलेल्या केएमटी बसेसचे 20 लाख रुपये कोणी द्यायचे? असा सवाल केला. बैठकीला बाबा पार्टे, अशोक भंडारे, दिलीप देसाई, सुनीता पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button