कोल्हापुरात होणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा : दीपाली सय्यद | पुढारी

कोल्हापुरात होणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा : दीपाली सय्यद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा एप्रिलमध्ये कोल्हापुरात होणार आहे. कुस्ती कलेला प्रोत्साहन देणारे छत्रपती राजर्षी शाहूरायांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त घेण्यात येणारी ही स्पर्धा अधिकृत स्पर्धा आहे, अशी माहिती दीपाली सय्यद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यापूर्वी ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे घेण्यात येणार होती; परंतु शाहू स्मृतिशताब्दी निमित्ताने हा बहुमान कोल्हापूरला देण्यात आला आहे. यासाठी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या सहकार्यातून खासबाग मैदानात ही स्पर्धा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व अस्थायी समिती या दोन्ही संघटनांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जाहीर केली असली तरी शासनाने ही स्पर्धा घेण्याबाबत मला पत्र दिले आहे. त्यामुळे कुस्तीची परंपरा असलेल्या कोल्हापुरात एप्रिलमध्ये होणारी महिलांची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धाच अधिकृत असेल. या स्पर्धेतील महिलांना महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्यांना शासनाकडून ज्या सवलती दिल्या जातात त्या मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही सय्यद यांनी सांगितले.

खा. संजय मंडलिक यांनी सांगितले की, शासनाच्या निर्णयानुसार ही स्पर्धा कोल्हापुरात होत आहे. महिला मल्लांची संख्या कोल्हापुरात अधिक आहे. त्यामुळे ही स्पर्धा कोल्हापुरात घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा दिमाखदार घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला कोल्हापूरची जनता निश्चित साथ देईल, यातील अडथळे लवकरच आम्ही दूर करू.

कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद बाळासाहेब लांडगे यांच्याशी आपण चर्चा केली आहे. या स्पर्धेबाबत कुस्ती परिषदेला शासनाने पत्र द्यावे. या स्पर्धेला गालबोट लागू नये म्हणून अस्थायी समितीला सोबत घेऊन ही स्पर्धा आपण कोल्हापुरात घेऊ असे सांगितले. रोहित पाटील यांनी महाराष्ट्र कुस्ती परिषद व अस्थायी समितीमार्फत ही स्पर्धा घेण्यास आपली काही हरकत नाही, असे सांगितले.

संघटनांशी चर्चा

पत्रकार परिषदेपूर्वी दीपाली सय्यद यांनी जिल्ह्यातील कोल्हापूर तालीम संघ, अस्थायी समिती यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्वांशी मते ऐकून घेतली. यावेळी व्ही. बी. पाटील यांच्यासह हिंदकेसरी दीनानाथ सिंह, हिंदकेसरी विनोद चौगुले, उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले, रोहित पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकीत तालीम संघ व अस्थायी समिती सदस्यांमध्ये वादावादी झाल्याचे समजते. यावर सय्यद यांनी वाद न घालता आता कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू, असे सांगत ही चर्चा आटोपती घेतली.

Back to top button