ठाकरेंना कोकण जवळ करणार नाही : पालकमंत्री दीपक केसरकर

दीपक केसरकर
दीपक केसरकर
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोकणची जनता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून प्रेरित आहे. हिंदुत्वाचे विचार सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे त्यांनी आता सहानुभूतीचे कितीही भांडवल केले तरी कोकणची जनता ठाकरे यांना स्वीकारणार नाही, असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ते पत्रकारांशी बोलत होते.

केसरकर म्हणाले, शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणची जनता बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिली. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेत येताच कोकणावर अन्याय करण्यास सुरुवात केली. अनेक महत्त्वाचे प्रकल्प कोकणातून बाजूला नेण्यात आले. भूविकास बँकेच्या माध्यमातून कोकणातील शेतकर्‍यांनी कर्जे घेतली, त्याची परतफेडही केली. अशा प्रामाणिक लोकांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या अडीच वर्षांत काहीच दिले नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी आताचे सरकार काम करत आहे.

अशावेळी कोकणात येऊन उद्धव ठाकरे व त्यांचे लोक भावनिक साद घालून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याचा उपयोग होणार नाही. काही दिवसांपूर्वी खेडमध्ये त्यांनी सभा घेतली होती. आज तेथे जाऊन उद्धव ठाकरे यांनी पसरवलेलेे गैरसमज आम्ही दूर करू. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची असल्याचे कोकणच्या जनतेला पटवून देऊ, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला कधीही जवळ केले नाही. त्यांना शेवटपर्यंत त्यांनी विरोधच केला. काँग्रेस व राष्ट्रवादीनेे आजपर्यंत सर्वांना फसविले आहे. अशा फसव्या लोकांच्या सोबत उद्धव ठाकरे गेले. हिंदुत्व सोडून त्यांच्या मांडीला मांडीला लावून बसू लागले. लोकांना हे रुचलेले नाही. त्यामुळेच आम्हीही त्यांच्यापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला, याचा पुनरुच्चार केसरकर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news