

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या निर्णयानुसार शिवाजी विद्यापीठासह राज्यातील 13 अकृषी विद्यापीठाचे कर्मचारी सोमवार (दि. 20) पासून काळ्या फिती लावून काम व दुपारच्या सत्रात निदर्शने करण्यात येणार आहेत. दरम्यान, बुधवारी बेमुदत काम बंद आंदोलनाचा अंतिम निर्णय होणार आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठात 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्यांची संख्या मोठी असून त्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू नाही. जुनी पेन्शन योजनेसाठी 16 मार्चपासून राज्यातील 10 हजारांहून अधिक विद्यापीठ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. विद्यापीठ कर्मचारी दि. 20 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करणार होते.
दरम्यान, रविवारी रात्री महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक झाली. यात राज्यातील विद्यापीठ कर्मचार्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाबाबत चर्चा झाली. त्यानुसार राज्य पदाधिकारी मते व्यक्त केली. त्यानुसार 22 मार्चपर्यंत काळ्याफिती लावून केले जाईल. त्यानंतर 22 तारखेला अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत ठरले. यावेळी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. सुनिल भिवार, शिवराम लुटे, केतन कांन्हेरे महासचिव मिलींद भोसले यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित होते.