कोल्हापूर : केएमटी मोजतेय अखेरची घटका!

कोल्हापूर, सुनील सकटे : केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 15 वर्षांपूर्वीची शासकीय वाहने भंगारात जाणार आहेत. याचा फटका केएमटीला बसणार आहे. या निर्णयामुळे बुडत्याचा पाय खोलात अशी केएमटीची अवस्था होणार आहे. केएमटीच्या ताफ्यातील सुमारे 26 हून अधिक बसेस भंगारात जाणार असल्याने त्या प्रवासी वाहतूक करणार नाहीत. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातील 150 फेर्या बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मोठ्या प्रमाणात बसेस भंगारात जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय तर होणारच आहे. शिवाय केएमटीच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. केएमटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार केएमटीच्या ताफ्यात 129 बसेस आहेत. त्यापैकी केवळ 66 बसेस शहरासह ग्रामीण भागातील विविध मार्गांवर धावतात. तर 63 बसेस विविध कारणांनी वर्कशॉपमध्ये थांबून आहेत.
प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक करणार्या 66 बसेसमार्फत शहर आणि ग्रामीण भागात रोज 850 फेर्या केल्या जातात. या फेर्यांमधून रोज सुमारे 40 हजार प्रवासी प्रवास करतात. तर सात लाख 50 हजार रुपयांचे रोजचे उत्पन्न आहे. उत्पन्न मोठे दिसत असले तरी केवळ डिझेलचा रोजचा खर्च 4 लाख 25 हजार रुपयांचा आहे. उर्वरित खर्च वेगळा.
दिवसभरात शहरासह ग्रामीण भागातील 25 मार्गांवर 425 जाताना 425 येताना अशा रोज केएमटी बसेसच्या 850 फेर्या होतात. आता 66 पैकी 26 बसेस भंगारात जाणार असल्याने त्या बसेस वापरता येणार नाहीत. परिणामी, अस्तित्वातील मार्गावरील बसेसच्या फेर्या बंद कराव्या लागणार आहेत. एक एप्रिलपासून या मुदतबाह्य बसेस भंगारात जाणार आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील काही मार्गांवरील बसफेर्या बंद करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. भंगारात बसेस जाणार असल्याने बसफेर्या कमी होऊन प्रवाशांवर ताटकळत थांबण्याची वेळ येणार आहे.