कर्मचारी संपाचा फटका; ‘सीपीआर’मधील २०० शस्त्रक्रिया खोळंबल्या | पुढारी

कर्मचारी संपाचा फटका; ‘सीपीआर’मधील २०० शस्त्रक्रिया खोळंबल्या

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचार्‍यांच्या संपाचा गुरुवार हा तिसरा दिवस होता. दरम्यान, सीपीआर हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना महापालिका तसेच खासगी रुग्णालयांत पाठविले जात आहे तसेच ऑर्थोपेडिक, कान, नाक, घसा, डोळे आदी सर्वप्रकारच्या नियोजित 200 शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्याची माहिती संबंधित रुग्ण आणि नातेवाईकांना फोनद्वारे देण्यात आली आहे.

बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना महापालिकेच्या पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयांकडे परस्पर पाठविले जात आहे. त्याचा संबंधितांना त्रास सहन करावा लागत आहे. संपामुळे सर्वप्रकारची प्रशासकीय कामे ठप्प आहेत. केवळ अपवादात्मक नियमित सेवा सुरू आहेत. सकाळी आठ वाजता बाह्यरुग्ण विभाग सुरू होतो. येथे रुग्णांना केसपेपर काढून देणे, रुग्णवाहिकेतून आलेल्या रुग्णांना स्ट्रेचरवरून वॉर्डमध्ये नेणे अशाप्रकारची कामे व्हाईट आर्मीच्या जवानांकडून सुरू आहेत. तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी प्रत्येक वॉर्डमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळेतील बाह्यरुग्ण विभागातील गर्दीवर फारसा परिणाम झालेला नाही. या विभागामध्ये गर्दी कायम आहे.

‘पीडब्ल्यूडी’त कर्मचार्‍याला स्वच्छतागृहात कोंडले!

बेमुदत संपात सहभागी न होता, कामावर हजर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण विभागातील कर्मचार्‍यांना समन्वय समितीने बांगड्यांचा आहेर दिला; तर स्वच्छतागृहात लपून बसलेल्या एका कर्मचार्‍याला कोंडून घातले. दिवसभरात विविध कार्यालयांतून 60 कर्मचार्‍यांना समन्वय समितीने बाहेर काढले. संपात सहभागी न होता, कामावर जाणार्‍या कर्मचार्‍यांना शोधण्यासाठी समन्वय समितीने 20 महिला व 20 पुरुष अशा 40 कर्मचार्‍यांचे शोधपथक स्थापन केले आहे. गुरुवारी या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागात पाहणी केली. यावेळी 15 ते 16 कर्मचारी कामावर असल्याचे दिसले. वारंवार सांगूनही जे बाहेर येत नव्हते, अशा दोन कर्मचार्‍यांना महिलांनी बांगड्यांचा आहेर दिला. एकाला बांगड्या घालण्याचाही प्रयत्न झाला.

समन्वय समितीचे पथक आल्याचे समजताच दोघे कर्मचारी स्वच्छतागृहात गेले. त्यातील एकजण बाहेर आला. मात्र, वारंवार सांगूनही बाहेर न येणार्‍या एका कर्मचार्‍याला स्वच्छतागृहातच बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवण्यात आले. सीपीआरमध्येही असाच प्रकार झाला. काही कर्मचारी स्वच्छतागृहात जाऊन लपले. तेथून त्यांना बाहेर काढण्यात आले.

मस्टरवर सही करणार्‍यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

काही कर्मचारी संपात असल्याचे सांगून कार्यालयात जाऊन मस्टरवर सही करतात आणि निघून जातात. ते संपातही सहभागी होत नाहीत आणि कार्यालय व संघटनेचीही फसवणूक करत आहेत, अशा कर्मचार्‍यांची यादी देतो, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले.

Back to top button