कोल्हापूरात कचरा उठाव, करवसुली ठप्प | पुढारी

कोल्हापूरात कचरा उठाव, करवसुली ठप्प

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सुरू झालेल्या बेमुदत संपात मंगळवारी महापालिकेतील तब्बल साडेतीन हजारांवर कर्मचारी सहभागी झाले. यात कचरा उठाव, संकलन करणार्‍या कर्मचार्‍यांसह इतरांचा समावेश होता. झाडू कामगारही रस्त्यावर नसल्याने शहरात स्वच्छता झाली नाही. कोल्हापूर शहरातील कचरा उठाव झाला नाही. परिणामी नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावरच कचरा राहिला. तसेच घरफाळ्यासह विविध विभागांची वसुली ठप्प झाली.

थेट नागरिकांशी संबंधित महापालिकेच्या सेवा असल्याने नागरिकांची मंगळवारी तारांबळ उडाली. महापालिकेतील सर्वच विभागाचे कामकाज ठप्प झाले. फक्त विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. इतर कर्मचारी संपात सहभागी झाल्याने काही विभागांना चक्क कुलूप ठोकण्यात आले होते. नागरी सुविधा केंद्रे सुरू असली तरी त्याठिकाणी खासगी कंपनीचे कर्मचारी होती. महापालिकेचे कर्मचारी सुविधा केंद्राकडे फिरकले नाहीत.

सध्या मार्चची धामधूम सुरू आहे. महापालिकेच्या 2023-24 या आर्थिक वर्षातील बजेटबरोबरच मार्च एंडिंगमुळे वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांची धावपळ सुरू आहे. त्यासाठी गेले काही दिवस रात्रंदिवस महापालिकेतील कर्मचारी घरफाळा, पाणीपट्टीसह विविध विभागांच्या वसुलीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. परंतु आज तेच कर्मचारी संपात सहभागी झाल्याने त्याचा महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाला.

महापालिका कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, जनरल सेक्रेटरी अजित तिवले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कर्मचारी महापालिकेत एकत्र आले. त्यानंतर सर्वजण टाऊन हॉल येथे जमून मोर्चात सहभागी झाले. पुढील निर्णय होईपर्यंत संपात सहभागी राहण्याचा निर्धार करण्यात आला. मोर्चात कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, खजानीस सिकंदर सोनुले, सेक्रेटरी अनिल साळोखे, अजित सरनाईक, महादेव कांबळे, मारुती दाभाडे, अन्वर शेख आदीसह इतर सहभागी होते.
दरम्यान, दवाखाने, पाणी पुरवठा, अग्निशमन दल, स्मशानभूमी आदी सेवा सुरळीत सुरू होत्या.

कचरा उठावसाठी महापालिकेचे प्रयत्न…

कोल्हापुरात कचरा उठाव आणि संकलनासाठी महापालिकेची 180 टीपर वाहने आहेत. घरोघरी जाऊन टीपरद्वारे कचरा संकलन केले जाते. परंतु या वाहनांचे चालक व इतरही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. उपायुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी ठेकेदार कंपनीबरोबर बोलून चालक हजर ठेवण्याची सूचना केली आहे. बुधवारी शहरातील कचरा उठाव केला जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. त्याबरोबरच जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी पाणी पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

कर्मचार्‍यांनी मनपाजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन

राज्यव्यापी संपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. बुधवारी संप सुरू राहणार आहे. सर्व कर्मचार्‍यांनी सकाळी 9.30 वा. महापालिकेजवळ उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी अजित तिवले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Back to top button