कोल्हापूर : राजाराम कारखान्यासाठी 23 एप्रिलला मतदान

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. कारखान्याच्या सन 2023-28 या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, कारखान्याच्या संचालकांची संख्या यावेळी दोनने वाढून 21 झाली आहे. 20 मार्चपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होत 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
20 ते 27 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दाखल अर्जांची छाननी 28 मार्च रोजी होणार आहे. वैध उमेदवारांची यादी 29 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 एप्रिल असून 13 एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होईल तर 25 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
मागील निवडणूक होऊन आठ वर्षे झाली, सुरुवातीला कोव्हिड आणि त्यानंतर सभासद पात्र-अपात्र यासाठी न्यायालयीन कारणाने निवडणूक लांबली. माजी आमदार अमल महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्याकडून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जुन्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सात तालुक्यांतील 122 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याचे एकूण 13538 सभासद आहेत, यामध्ये 13409 ऊस उत्पादक सभासद तर 129 ‘ब’ वर्ग सभासद निवडणुकीत मतदानासाठी पात्र ठरले आहेत. सर्वाधिक सभासद करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील आहेत.
निवडणूक कार्यक्रम असा
20 ते 27 मार्च : उमेदवारी अर्ज दाखल
28 मार्च : अर्जांची छाननी
29 मार्च : वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध
12 एप्रिल : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
13 एप्रिल : अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध
23 एप्रिल : मतदान
25 एप्रिल : मतमोजणी