

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : निर्णय झाल्यानंतरच आता माघार घेऊ. तोपर्यंत संप सुरूच ठेवू, असा निर्धार करत मंगळवारी जिल्ह्यातील 80 हजार सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी बेमुदत संपावर जात, जुन्या पेन्शनसाठी सरकारविरोधात एल्गार पुकारला. संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. शाळा-कनिष्ठ महाविद्यालये बंद राहिली.
नवीन पेन्शन योजना रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली होती. त्याला जिल्ह्यात पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या जिल्हा समन्वय समितीने शहरातून रॅली काढली. रखरखत्या उन्हात काढलेल्या या रॅलीत 25 हजारहून अधिक कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले होते. 'एकच मिशन जुनी पेन्शन' असा नारा देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच कर्मचारी, शिक्षक गटागटाने टाऊन हॉल उद्यान जमा होत होते. समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर म्हणाले, कर्मचार्यांच्या वेतन आणि पेन्शनवरून जनतेची दिशाभूल केली तर पैसा येतो कसा आणि जातो कुठे हे सर्व जनतेसमोर मांडू असे सांगत एकाही संपकरी कर्मचार्यावर कारवाई करून दाखवा, 1977 पेक्षा ही मोठा संप होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. पाटील म्हणाले, शिक्षक म्हणून नोकरी करताना अशैक्षणिक कामेच अधिक करून घेतली जातात. ही कामे प्रथम रद्द करा, नवे शैक्षणिक धोरण रद्द करा. 'कोजिमाशी'चे दादा लाड म्हणाले, कोणी कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी मागणी मान्य होईपर्यंत संप चालूच राहील. कॉ. दिलीप पवार यांनी एकजूट कायम ठेवा, लढा तीव्र होईल. अतुल दिघे म्हणाले, एकजुटीनेच प्रश्नांची सोडवणूक करता येईल. मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत डावरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यानंतर टाऊन हॉलमधून रॅलीला प्रारंभ झाला. सीपीआर चौक, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळामार्गे रॅली बिंदू चौकात आली. रॅलीत जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. रॅली शिवाजी रोड, शिवाजी चौक, महापालिकामार्गे पुन्हा टाऊन हॉलसमोर आली. भाऊसिंगजी रोडवर रॅलीची सांगता झाली. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी, विद्यापीठ विकास आघाडी, शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटना, गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँक आदींनी संपाला पाठिंबा दिला. बुधवारपासून सकाळी 10 ते 2 या वेळेत टाऊन हॉलमध्ये कर्मचार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने केले.
यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे निलेश म्हाळुंगे, जिल्हा परिषद आरोग्य संघटनेचे कुमार कांबळे, एम. ए. भाट, महसूल कर्मचारी संघटनेचे विनायक लुगडे, अकिल शेख, दत्तात्र पडळकर, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल काटकर, बी. एस. खोत, जलसंपदा विभागाचे संजय खोत, कृषी विभागाचे शशिकांत चापले, महापालिका कर्मचारी संघाचे विजय वणकुंद्रे, शासकीय मुद्रणालयाचे विठ्ठल वेळणकर, अनिल खोत, वाहन चालक संघटनेचे संजय क्षीरसागर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे रमेश भोसले, मलेरिया संघटनेचे नितीन कांबळे, बाजीराव कांबळे, शासकीय कर्मचारी संघटनेचे दिलीप शिंदे, दत्तात्रय सुतार, कोषागार संघटनेचे दीपक शिंदे, संतोष साळोखे, नर्सिंग फेडरेशनच्या संजीवनी दळवी, हाशमत हावेरी, पोलिस अधिक्षक कार्यालयाचे जितू कुलकर्णी, आयटीआयचे अनिल कांबळे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पाटबंधारे विभागाचे उमेश सावंत, अमित पाटील, राजेंद्र गंधवाले, कनिष्ठ अभियंता संघटनेचे सचिन माने, वस्तू व सेवा कर विभागाचे राजू आंबेकर, महंमद खान, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे महेश सावंत, योगेश जंगम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे राकेश ढाले, परिचारिका संघटनेचे मनुजा रेणके, योगेश यादव, राजाराम महाविद्यालयाचे ज्ञानेश्वर हजारे, नंदकुमार इंगवले, सुधाकर भांदिगरे, राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पूनम पाटील, न्यायालयीन स्टेनोग्राफर संघटनेचे रवींद्र गुजर, शिक्षक संघटनेचे बी. डी. पाटील, शारीरिक शिक्षक संघटनेचे आर. डी. पाटील, महापालिका शिक्षक संघटनेचे राजाध्यक्ष सुधाकर सावंत, संस्था चालक संघाचे वसंतराव देशमुख, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे सी. एम. गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.
दिशाभूल केली तर ती कॅसेट बाहेर काढू
सरकारकडे पैसा येतो कसा आणि तो जातो कुठे हे कर्मचार्यांना चांगलेच माहित आहे. प्रत्येकवेळी तिजोरीत खडखडाट आहे असे सांगितले जात होते, तेव्हा निवृत्त कर्मचार्यांनी सरकारचा पैसा जातो कुठे याची माहिती देणारी कॅसेट तयार केली. त्या प्रत्येक गावांच्या यात्रेत-जत्रेत दाखवण्याची तयारी केली. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी असे काही करू नका. यापुढे तिजोरीत खडखडाट आहे असे कोणी म्हणणार नाही, असे सांगितले. यामुळे ती कॅसेट दाखवत नाही. आता जनतेची दिशाभूल करणार असाल तर ती कॅसेट पुन्हा बाहेर काढू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.