‘राजारामची’ ची लढाई आता थेट मैदानात

‘राजारामची’ ची लढाई आता थेट मैदानात
Published on
Updated on

कोल्हापूर; विकास कांबळे :  गेल्या साडेतीन-चार वर्षांपासून राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या पात्र-अपात्रतेवरून आ. सतेज पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर निर्णय झाल्यामुळे आता निवडणुकीच्या थेट मैदानातच काटाजोड लढत रंगणार आहे. आ. सतेज पाटील यांच्या प्रतिष्ठेची आणि माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे राजाराम कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा आ. पाटील व आ. महाडिक यांच्यातील टोकाची ईर्ष्या पाहावयास मिळणार आहे.

जिल्ह्याच्या राजकारणातून महाडिक गटाचे वर्चस्व संपविण्यासाठी आ. सतेज पाटील यांनी चंग बांधल्यानंतर त्यांनी महाडिकविरोधी मोट बांधण्यास सुरुवात केली. हे करत असताना ते विरोधी गटाच्या लोकांना मदत करत गेले. त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी महाडिकांना रोखण्यात यश मिळत गेले. प्रथम महापालिकेतील महाडिकांचे वर्चस्व संपविले. त्यानंतर जिल्हा परिषद, बाजार समितीतही आपले वर्चस्व निर्माण केले. विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही महाडिक यांचा पराभव केला. महाडिकांचे जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व निर्माण होण्यासाठी 'गोकुळ'मधील भूमिका महत्त्वाची असल्यामुळे पाटील यांनी गोकुळकडे आपला मोर्चा वळविला. या ठिकाणीही महाडिक यांना चारीमुंड्या चित केले. आता महाडिक यांच्याकडे एकमेव सत्तास्थान असलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा कारखाना कसबा बावड्यामध्ये असल्यामुळे आणि आ. पाटील यांचे निवासस्थानही बावड्यामध्येच असल्यामुळे त्यालाही सुरुंग लावण्यासाठी पाटील गेली दहा-बारा वर्षे प्रयत्न करत आहेत.

बोगस किंवा कार्यक्षेत्राबाहेरील सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी आ. पाटील यांनी संघर्ष केला. सहकार निबंंधकांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत यावर सुनावण्या झाल्या. परंतु, यामध्ये महाडिक गटाला यश आल्यामुळे आ. पाटील गटाला धक्का बसला आहे. सहकाराच्या निवडणुकीत सभासद अपात्र ठरविण्यासाठी केलेला संघर्षदेखील महत्त्वाचा असतो. कारण, यावरच निवडणुकीचा कल समजतो, असे मानले जाते. या संघर्षात अपयश आले, तरीही न डगमगता आ. पाटील यांनी थेट मैदानात लढण्यासाठी पायाला भिंगरी बांधली आहे.

कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग आता फुंकले गेले आहे. राजाराम कारखान्यात गेल्या तीन दशकांपासून महाडिक यांची सत्ता आहे. सर्व सभासद मतदानास पात्र ठरविण्यात आल्यामुळे महाडिक गटाने उपांत्य सामना जिंकला आहे. यामुळे महाडिक गटामध्ये चैतन्य निर्माण झाले असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता थेट लढाई निवडणुकीच्या मैदानात होणार आहे. सर्व सभासद मतदारांना पात्र ठरविले असले आणि ही मते निर्णायक असल्याचे मानले जात असले, तरी निवडणुकीच्या मैदानात महाडिक गटाला नियोजनात माहीर असणार्‍या सतेज पाटील यांच्या रणनीतीवर बारीक लक्ष ठेवून निवडणुकीचे नियोजन करावे लागणार आहे. कारण, सर्व सत्तास्थाने महाडिक गटाकडून पाटील यांनी यापूर्वी काढून घेतली आहेत. राजाराम कारखाना हे एकमेव सत्तास्थान त्यांच्याकडे राहिले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत काढून घेण्यासाठी आ. पाटील गेल्या काही वर्षांपासून धडपडत आहेत. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनविली आहे.

'राजाराम'च्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष

राजाराम कारखान्याच्या वाढीव तसेच कार्यक्षेत्राबाहेरील सभासदांच्या सभासदत्वावर आ. सतेज पाटील गटाने हरकत घेतली होती. गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून यावर संघर्ष सुरू होता. अखेर साखर सहसंचालकांनी आ. पाटील गटाच्या हरकती फेटाळून लावल्या. महाडिक यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे त्यांना कारखान्यावरील आपली सत्ता कायम राखावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत अल्पमताने आ. पाटील यांच्या आघाडीला पराभव पत्करावा लागला होता. आता महाडिक सत्ता राखणार की पाटील गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news