हसन मुश्रीफ तीस तासांपासून नॉट रिचेबल | पुढारी

हसन मुश्रीफ तीस तासांपासून नॉट रिचेबल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ईडीने बजावलेल्या समन्सनुसार राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते आ. हसन मुश्रीफ हे ईडीसमोर हजर राहणार की मुदत घेणार याकडे लक्ष लागले आहे. मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने दुसर्‍यांदा छापा टाकल्यापासून गेले तीस तास हसन मुश्रीफ हे नॉट रिचेबल आहेत. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खा. भावना गवळी यांच्यासह अनेकांनी ईडीने बजावलेल्या समन्सनुसार हजर न राहता मुदत घेतली होती. दरम्यान, मुश्रीफ यांचे चार्टर्ड अकाऊंटंटही ईडीच्या रडारवर असल्याचे समजते.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासदांवरून झालेल्या तक्रारीनंतर मुश्रीफ यांची ईडीने चौकशी केली. 11 जानेवारी व 11 मार्च रोजी त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. 11 जानेवारीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासह घोरपडे कारखान्याशी संबंधित दोन शाखांवर ईडीने छापे टाकले होते. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांना चौकशीसाठी मुंबईला नेले होते. बँकेतून घोरपडे कारखान्याशी संबंधित काही कागदपत्रे ताब्यात घेतली होतीत. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांना दिल्या जाणार्‍या कर्जाची कागदपत्रे असलेली बँकेतील खोली ईडीने सील केली आहे.

दरम्यान, 8 मार्च रोजी राज्याच्या सहकार विभागाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चाचणी लेखा परीक्षणाचे आदेश दिले. यामध्ये संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच ब्रिस्क फॅसिलिटीज (शुगर डिव्हिजन) कंपनीला जिल्हा बँकेने दिलेले कर्ज तसेच शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या रकमांचा व बँकेचा सहसंबंध याचे विशेष लेखापरीक्षण होणार आहे.

हसन मुश्रीफ आमदार आहेत. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ ईडीसमोर हजर राहणार की, हजर राहण्यासाठी मुदत घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button