कोल्हापूर, हातकणंगले स्थानकांसाठी 28 कोटींचा निधी | पुढारी

कोल्हापूर, हातकणंगले स्थानकांसाठी 28 कोटींचा निधी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अमृत भारत योजनेतून कोल्हापूर आणि हातकणंगले रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. याअंतर्गत कोल्हापूरसाठी 16 कोटी, तर हातकणंगलेसाठी 12 कोटी असा दोन स्थानकांसाठी 28 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे या स्थानकांचा नियोजनबद्ध विकास व्हावा, मंजूर सर्व निधी खर्च व्हावा यासाठी आमदार-खासदारांनी एकत्रपणे पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

अमृत भारत योजनेंतर्गत कोल्हापूर व हातकणंगले स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी चांगला निधी मिळणार आहे. हा निधी वर्षभरात खर्च करावा लागणार आहे. यामुळे उपलब्ध निधीनुसार स्थानक विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करणे गरजेचे आहे. पुढील काही वर्षांचा विचार करून स्थानकावर कोणत्या सुविधा हव्या, कोणत्या सुविधा वाढवायच्या याबाबत या आराखड्यात विचार होणे गरजेचे आहे.

रेल्वे स्थानकाची इमारत हेरिटेज आहे. त्यामुळे या इमारतीला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन विकास करावा लागणार आहे. केवळ सुशोभीकरण, रंगरंगोटी, फलक लावणे असल्या कामासाठी पैसे खर्च न होता स्थानकाचा हेरिटेज लूक अधिक चांगला कसा दिसेल, परिसर किती आकर्षक होईल, पार्किंगसह प्रवाशांना विविध सुविधा कशा उपलब्ध होतील, या द़ृष्टीने आराखड्यात नियोजन होणे गरजेचे आहे.

सध्या या कामांवर सुरू आहे चर्चा….

* सध्याची जनरल तिकीट विक्री खिडकी बंद करून त्या ठिकाणी व्हीआयपी लाऊंज करणे
* आरक्षण केंद्राशेजारी जनरल तिकीट विक्री खिडकी सुरू करणे
* रेल्वेस्थानकावरील मध्यवर्ती प्रवेशद्वार विस्तारित करणे. त्याद्वारे स्थानकावरील प्रवेश भव्य होईल.
* सुरक्षा दल, पोलिस यांची कार्यालये स्थलांतरित करणे

Back to top button