हुपरीला कालव्यात मृतदेहासह आढळली जळालेली कार | पुढारी

हुपरीला कालव्यात मृतदेहासह आढळली जळालेली कार

हुपरी, पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार महिन्यांपासून कारसह बेपत्ता असणार्‍या मोतीराम महादेव रजपूत (वय 65, रा. अंबाबाईनगर, रेंदाळ) यांचा मृतदेह हुपरीजवळील त्यांच्या शेडजवळच असणार्‍या कालव्यात शनिवारी आढळला.

हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील माळरानावर जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणार्‍या कालव्यात सडलेल्या मृतदेहासह कार शनिवारी आढळून आली. ही कार अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून, हा अपघात की घातपात? याची चर्चा सुरू आहे.

रजपूत यांचा एक पाय अर्धांगवायूमूळे निकामी झाला होता. त्यामुळे त्यांना औषधोपचारासाठी ये-जा करण्यासाठी कार घेतली होती. या निर्जन माळरानावरील कालव्यात पावसाचे पाणी साचले आहे. कालव्यालगतच त्यांचे शेड आहे. तेथे ते कारमध्ये बसून गाणी ऐकत असत, अशी वर्दी पोलिसांत देण्यात आली.

सडलेला मृतदेह; जळालेली कार

कालव्यातील पाणी कमी झाल्यामुळे शनिवारी सकाळी कारची चाके दिसू लागली. याची माहिती पोलिसांना निनावी फोनद्वारे मिळाली. सपोनि पंकज गिरी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनने कार बाहेर काढण्यात आली. ती अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती, तर मोतीराम यांचा मृतदेह सडला होता.

घटनेचे गूढ वाढले

कार पेटवली का पाण्यात राहिल्यामुळे गंजली, याचा तपास सुरू आहे. आरोग्यसेवक जीवन नवले याने पोलिसांना सहकार्य केले. मोतीराम चार महिन्यांपासून कारसह बेपत्ता असल्याची नोंद हुपरी पोलिसांत आहे. कारमध्ये गाणी ऐकत बसण्याची सवय आणि त्यामुळे त्या अवस्थेत कार कालव्यात पडली असण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. तसेच घातपाताची शक्यता पोलिस तपासून पाहत आहेत. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आहे.

Back to top button