कोल्हापूर : डीएम कार्डिओलॉजी अभ्यासक्रमाला मान्यता | पुढारी

कोल्हापूर : डीएम कार्डिओलॉजी अभ्यासक्रमाला मान्यता

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने हृदयशस्त्रक्रिया विभागात एमसीएच (कार्डिओ व्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी) या सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाला मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी डीएम कार्डिओलॉजी या हृदयरोगावरील उपचार पद्धतीच्या अभ्यासक्रमाला हिरवा कंदील दाखविला आहे.

हृदयरोगावरील सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाची सोय असलेले कोल्हापूर हे मुंबई, नागपूरपाठोपाठ तिसरे शहर ठरले आहे. दै. ‘पुढारी’च्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे घवघवीत यश आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी तीन जागांना मंजुरी दिली आहे.

डीएम कार्डिओलॉजी या अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश मिळविण्यासाठी खूप चढाओढ असते. खासगी संस्थांमध्ये त्यासाठी भले मोठे शुल्क आकारले जात असल्याची चर्चा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू होत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील गुणवान विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

हृदयशस्त्रक्रिया विभागाने फडकविली पताका!

सीपीआर रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागाने कोल्हापूरसह तळकोकण आणि उत्तर कर्नाटकातील गोरगरीब रुग्णांसाठी मोठे योगदान दिले आहे. अत्यंत अवघड शस्त्रक्रिया जोखमीने पार पाडून रुग्णांच्या चेहर्‍यावरचे हसू पाहिले आहे. बुधवारी महिला दिनी या रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागात 86 वर्षीय शालाबाई शामराव कोराणे (रा. गडमुडशिंगी) या महिलेला हृदयविकाराचा जोराचा झटका आल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अवघे 42 किलो वजन असलेल्या या वृद्धेवर विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हाताच्या मनगटातून (रेडियल) अँजिओग्राफी व पाठोपाठ अँजिओप्लास्टी करून या महिलेचे प्राण वाचविले.

Back to top button