कोल्हापूर : लाचखोरीने पुन्हा ‘खाकी’ डागाळली! | पुढारी

कोल्हापूर : लाचखोरीने पुन्हा ‘खाकी’ डागाळली!

कोल्हापूर, दिलीप भिसे : वर्दी आणि इनामापेक्षा पैशाला सोकावलेल्या प्रवृत्तीमुळे कोल्हापूर पोलिस दलाला नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. दीड वर्षात सहा-सात पोलिस बडतर्फ झाले. काहींचे निलंबन, तर बर्‍याच जणांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला असतानाही लाचखोरीची प्रवृत्ती बळावत आहे. कायद्याचे रक्षकच लाचखोर ठरू लागल्याने पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. झारीतील शुक्राचार्यांच्या स्वार्थापोटी ‘खाकी’ ला लागणारा डाग यंत्रणेला मारक ठरू लागला आहे.

क्रिप्टोकरन्सी फसवणूकप्रकरणी एजंटांवरील कारवाईसाठी दाखल अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच स्वरूपात 8 लाखांची रक्कम स्वीकारणार्‍या जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नागेश म्हात्रे व हवालदार रूपेश कुंभार यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शनिवारी पहाटे रंगेहाथ पकडले. सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यासह हवालदाराला लाचप्रकरणी अटक झाल्याने पोलिस दलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.

प्रामाणिक घटकांचीही मानहानी!

अलीकडच्या काळात कोल्हापूर पोलिस दलातील लाचखोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्‍या अधिकारी, पोलिसांनाही मानहानीला सामोरे जावे लागते आहे. वर्षापूर्वी वकीलपुत्राकडून 10 लाखांची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन कॉन्स्टेबलना रंगेहाथ जेरबंद केले होते.

निलंबित पोलिसाकडून कोटीची मागणी!

विशेष म्हणजे लाचखोरीचा प्रकार पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात घडल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनाही धक्का बसला होता. त्यानंतर पाठोपाठ एका निलंबित कॉन्स्टेबलने शेत जमिनीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणात खटल्याचा निकाल शेतकर्‍याच्या बाजूने लावून देण्यासाठी एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने पोलिस दलाची पुरती मानहानी झाली होती.

लाचखोरीमुळे पोलिस दल चर्चेत

अशा एक ना अनेक घटनांनी कोल्हापूर पोलिस दलाची यंत्रणा चर्चेत येत आहे. 1 जानेवारी ते 10 मार्च 2023 या काळात लाचखोरीला सोकावलेल्या तीन पंटरसह 10 लोकसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केली. 2022 ते 10 मार्च 2023 या काळात कोल्हापूर पोलिस दलांतर्गत 9 लोकसेवक जाळ्यात अलगदपणे सापडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पाच वर्षांत लाचखोरीच्या 167 घटना रेकॉर्डवर आल्या आहेत. त्यात प्रथम, द्वितीय श्रेणीतील अधिकार्‍यांचा समावेश सर्वाधिक आहेत.

हजारात नव्हे, लाखोंची उड्डाणे !

पोलिस दलासह महसूल, आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्था विभागांतर्गत लाचखोरीच्या घटना समाजातील सर्वच घटकांच्या मुळावर उठल्या आहेत. महागाई, बेकारीसह कोरोनाच्या काळात होरपळून निघालेल्यांनाही आयुष्यातून उठविणार्‍या आहेत. आर्थिक उलाढाली थंडावलेल्या असतानाही गरजूंना खिंडीत गाठून त्यांच्याकडे लाच स्वरूपात लाखोंची मागणी करणे आश्चर्यजनक ठरत आहे.

Back to top button