कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट होणार | पुढारी

कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट होणार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर चित्रनगरीत मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येतील. येत्या काळात या चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

आमदार रोहित पवार, हरिभाऊ बागडे, हसन मुश्रीफ, दीपक चव्हाण यांनी कोल्हापूर चित्रनगरीत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, सध्या मोठ्या प्रमाणावर या चित्रनगरीत आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यामुळे रोजगार आणि महसूल वाढ होण्यास मदत होत आहे.

चित्रपटांचे सेट आकर्षण ठरतील

येत्या काळात कोल्हापूर येथे 78 एकर परिसरात असलेल्या चित्रनगरीत चित्रीकरणासाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तेथे उभारण्यात आलेले चित्रीकरणाचे सेट पर्यटकांचे आकर्षण ठरतील.

छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर तयार करण्यात आलेल्या मालिका आणि चित्रपटांना देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करून ते आता 1 कोटी रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे, असेही मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

चांगल्या कंटेंटसाठी समिती

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आपली संस्कृती जतन, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगले कन्टेंट यावेत, यासाठी 5 तज्ज्ञांची समिती करण्यात आली आहे. तसेच मराठीत दर्जेदार चित्रपटनिर्मिती करणार्‍यांना राज्य शासनामार्फत दिल्या जाणार्‍या अनुदानाचे वाटपही नुकतेच केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Back to top button