कोल्हापूर : सीपीआरचा वरिष्ठ लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरचा वरिष्ठ लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार (सीपीआर) रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीचे स्थायित्व प्रमाणपत्रासाठी परिचारिकेकडून 5 हजारांची लाच उकळणार्‍या याच रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. हुसेनबाशा कादरसाब शेख (वय 47, रा. शनिवारपेठ, मूळ सोलापूर) असे त्याचे नाव आहे. पथकाने रात्री उशिरा त्याच्या घराची झडती घेतली. लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यास मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात येणार आहे.

तक्रारदार महिला शासकीय रुग्णालयात परिचारिका आहे. दहा वर्षांच्या नोकरीतील कार्यकाळानंतर स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अर्ज केला होता. शल्यचिकित्सक यांनी 20 दिवसांपूर्वी प्रमाणपत्राची पूर्तता केली होती. संबंधित प्रमाणपत्रही महिलेला देण्यात आले होते. मात्र, या मोबदल्यात वरिष्ठ लिपिकाने महिलेकडे 5 हजारांची मागणी केली होती. त्यासाठी त्याने तगादा लावला होता. वैतागलेल्या परिचारिकेने गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली.

संशयित मुळचा सोलापूर येथील कर्निकनगर येथील असून, सद्या त्याचे शनिवार पेठ येथील नागोबा मंदिराजवळ भाड्याच्या खोलीत वास्तव्य आहे. पथकाने येथील खोलीसह सोलापूर येथील घराची झडती घेतली.

45 दिवसांत 5 लोकसेवक जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने 45 दिवसांत 5 लोकसेवकांना लाचखोरीप्रकरणी रंगेहात जेरबंद केले आहे. आठवड्यापूर्वी शिरोळ नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांसह 4 जणांना अटक करण्यात आली होती. पाठोपाठ शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक 5 हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद झाला आहे.

Back to top button