श्रीक्षेत्र जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणासाठी 50 कोटी | पुढारी

श्रीक्षेत्र जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणासाठी 50 कोटी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र जोतिबा संवर्धन प्राधिकरणाची घोषणा गुरुवारी अर्थसंकल्पात केली. या प्राधिकरणासाठी पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्राधिकरणाद्वारे जोतिबा आणि परिसरातील गावांचा तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. यामुळे जोतिबा आणि परिसरासह जिल्ह्याच्याही धार्मिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

कोल्हापुरात कोल्हापुरी चपलांचे क्लस्टर उभारण्यात येईल, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली. यामुळे कोल्हापुरी चप्पल उद्योगाला बळ मिळणार आहे. नागपूर-गोवा हा नवा शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग अर्थात राज्यातून ‘शक्तिपीठ महामार्ग’ म्हणून विकसित केला जाणार आहे. या महामार्गाने जिल्ह्यातील नृसिंहवाडी आणि कोल्हापूर ही दोन अत्यंत महत्त्वाची धार्मिकस्थळे जोडली जाणार आहेत. कोल्हापूरच्या चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओ आणि प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. आजरा व चंदगड तालुक्यांत काजू फळविकास योजना राबविण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली.

महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा विकासासाठी प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली. यामुळे जोतिबा विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे. ‘श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र परिसर बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरण’ या नावाने हे प्राधिकरण साकारले जाणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.

या प्राधिकरणाच्या घोषणेसह प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी 50 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आर्किटेक्टची तत्काळ नेमणूक केली जाणार आहे. याकरिता येत्या आठ-दहा दिवसांत निविदा मागवल्या जाणार आहेत. आर्किटेक्टची नियुक्ती झाल्यानंतर तातडीने आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. दोन-तीन महिन्यांत जोतिबा आणि परिसर विकासाचा निधीसह सर्वंकष आराखडा तयार करून तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर विकास

जोतिबा देवस्थान डोंगरावर आहे. यामुळे तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर जोतिबा देवस्थानचा विकास केला जाणार आहे. त्यानुसार प्राधिकरणाची रचना आणि कार्य निश्चित केले जाणार आहे. जोतिबा मंदिर परिसर आणि संपूर्ण डोंगर कशा पद्धतीने विकसित करता येईल, शासकीय-निमशासकीय संस्थांच्या माध्यमातून कोणती कामे करता येतील, याबाबत आराखड्यात विचार केला जाणार आहे. डोंगरावरील अष्टतीर्थांचा विकास, प्रशस्त रस्ते, डोंगरावर जाण्यासाठी तीन बाजूंनी दुहेरी मार्ग, प्रवेशद्वार, तपासणी नाके, अन्नछत्र, भाविक निवास व्यवस्था आदी विविध बाबींचा यामध्ये समावेश केला जाणार आहे.

कोल्हापुरात उभारणार ‘चप्पल क्लस्टर’

कोल्हापुरी चप्पल देशभरच नव्हे, तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, या उद्योगाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. आता कोल्हापुरात चप्पल क्लस्टर उभा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. चप्पल क्लस्टरमुळे कोल्हापूरच्या चप्पल उद्योगाला मोठे बळ मिळणार आहे. या क्लस्टरमुळे जिल्ह्यात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.

कोल्हापुरातून जाणार ‘शक्तिपीठ मार्ग’

वर्धा जिल्ह्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी असा नागपूर-गोवा शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग अर्थात राज्यात हा ‘शक्तिपीठ महामार्ग’ म्हणून ओळखला जाणार असून, त्याचा तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 760 किलोमीटर लांबीचा आणि सुमारे 86 हजार 300 कोटी रुपये अपेक्षित खर्चाचा हा महामार्ग कोल्हापुरातून जाणार आहे. या महामार्गामुळे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, आंबेजोगाई ही शक्तिपीठे जोडली जाणार आहे. औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे, नांदेड येथील तख्त सचखंड श्रीहुजूर साहिब गुरुद्वारा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी व औदुंबर ही तीर्थस्थळेही जोडली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

जोतिबा परिसर विकासासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान

जोतिबा परिसराचा विकास करण्याची संकल्पना सर्वप्रथम 1990 मध्ये समोर आली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जोतिबा परिसर विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. त्याला कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनाही याचे निमंत्रण होते. मात्र, कार्यबाहुल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

शरद पवार यांनी या बैठकीत परिसर विकासाचा विषय मांडताना सरकारने जोतिबा परिसर विकासाचा आराखडा तयार केला आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी एक समिती नेमणे आवश्यक आहे. या समितीच्या अध्यक्षपदासाठी योग्य नाव सुचवावे, असा प्रस्ताव मांडला. यावर बैठकीस उपस्थित असलेल्या तत्कालीन खासदार बाळासाहेब माने, उदयसिंहराव गायकवाड, प्रकाश बापू पाटील, डॉ. डी. वाय. पाटील यांची नावे पुढे आली. त्यावर शरद पवार यांनी जोतिबा परिसर विकासाचा 5 कोटी रुपयांचा आराखडा आहे. सरकार त्यासाठी काहीही तरतूद करणार नाही. हा निधी तुम्हालाच उभारावा लागेल आणि त्यातूनच ही कामे करावी लागतील. निधी उभा करणे ही समितीची जबाबदारी राहील, असे जाहीर केले. त्यावर हे आम्हाला माहीत नव्हते, अशाप्रकारची प्रतिक्रिया सभागृहात उमटली.

तेव्हा बाळासाहेब माने यांनी जोतिबा परिसर विकास समितीला राज्य सरकार निधी देणार, अशा समजुतीतून ही नावे पुढे आली होती. मात्र, एवढा मोठा निधी उभा करणे कोणाला जमेल, असे आपल्याला वाटत नाही. ही जबाबदारी पेलू शकेल, अशी एकच व्यक्ती आहे; पण ती या बैठकीला उपस्थित नाही, असे सांगितले. त्यावर शरद पवार यांनी, ही व्यक्ती कोण? अशी विचारणा केली. तेव्हा बाळासाहेब माने यांनी ‘पुढारी’कार बाळासाहेब जाधव असे उत्तर दिले.

त्यावर शरद पवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी या नात्याने आपल्याला ‘पुढारी’कारांना फोन करा व बैठकीस येण्याची विनंती करा, असे सांगितले. त्यानंतर डॉ. प्रतापसिंह जाधव या बैठकीला आलेे. तेव्हा शरद पवार यांनी जोतिबा परिसर विकासाची संकल्पना मांडून त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. यासाठी 5 कोटींचा निधी जमवावा लागेल आणि परिसर विकासाची सर्व कामे मार्गी लावावी लागतील, असेही पवार म्हणाले. त्यावर डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी निधी जमविण्याची जबाबदारी आपण घेऊ, विकासकामे शासकीय यंत्रणेमार्फत व्हावीत, असे स्पष्ट करत जोतिबा परिसर विकास समिती व जोतिबा परिसर विकास निधी समिती स्वतंत्र असावी. निधी समितीची जबाबदारी आपण घेऊ, असे सांगितले.

त्यानुसार हा प्रस्ताव मान्य झाला. पुढे 31 जानेवारी 1991 रोजी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते जोतिबा डोंगरावर मुहूर्ताची पहिली कुदळ मारून जोतिबा परिसर विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, परिसरात वनीकरण, शौचालय व स्नानगृह संकुल, सांडपाण्याची निर्गत, भक्तनिवास व पार्किंग, असा आराखडा तयार करून तो पूर्ण करण्यात आला.

जोतिबा डोंगराला जाणारा एकच रस्ता होता. तेथे पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. सर्वात मोठी अडचण ही जोतिबा ते यमाई मार्ग, अशी होती. हा मार्ग केवळ दहा फुटांचा अरुंद होता. येथे चेंगराचेंगरी होत होती. ओबडधोबड दगडी पायर्‍या होत्या. याच मार्गावरून सासनकाठी व पालखी मिरवणूक जाते. हा मार्ग 32 फूट रुंद व सुव्यवस्थित अशा दगडी पायर्‍या करण्यात आल्या. त्याचबरोबर जोतिबा व यमाई मंदिर आवारात फरशी बसविण्यात आली. दीपमाळांचे स्थलांतर करण्यात आले. सेंटर प्लाझा व कमर्शियल कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात आली. भूमिगत विद्युतीकरण करून स्मृतिभवन उभारण्यात आले. अल्पकाळात 5 कोटींचा निधी जमविण्याचे काम डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. निधीची रक्कम फार मोठी होती. मात्र, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मोठ्या जिद्दीने ती जमा केली. हे काम एवढे सोपे नव्हते. अन्य कोणाला हे शिवधनुष्य पेलता आले असते, असे आपल्याला वाटत नाही. मात्र, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ते लीलया उचलले.

– शिवाजीराव देशमुख,
तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच जोतिबा परिसर विकास समितीचे अध्यक्ष

Back to top button