कोल्हापूर : कळंबा कारागृहाला लाडू प्रसादातून लाखोंचा महसूल | पुढारी

कोल्हापूर : कळंबा कारागृहाला लाडू प्रसादातून लाखोंचा महसूल

कोल्हापूर; गौरव डोंगरे :  करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा लाडू प्रसाद कळंबा कारागृहात बनवला जातो. अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे हे लाडू भाविकांच्याही आवडीचे बनले आहेत. दररोज सात ते आठ हजार लाडू कारागृहाकडून देवस्थान समितीला पाठविले जातात. सुट्टीदिवशी तर ही मागणी दहा हजारांच्या घरात पोहोचते. या लाडू प्रसादातून मागील आठ महिन्यांत 22 लाखांचा महसूल शासन तिजोरीत जमा झाला आहे. 2016 पासून अंबाबाई मंदिरात लागणार्‍या लाडूची निर्मिती कळंबा कारागृहात सुरू करण्यात येते.

आठ महिन्यांत 13 लाख लाडूंची विक्री

कोरोना काळात लाडूनिर्मिती थांबली होती. जून 2022 पासून लाडूनिर्मिती सुरू करण्यात आली. कारागृहात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन, स्वच्छता व पावित्र्य जपून लाडूनिर्मिती सुरू झाली. जून 2022 ते फेब—ुवारी 2023 या कालावधीत 13 लाख 3 हजार लाडूंची विक्री झाली असून दहा रुपये प्रतिनग या दराने 1 कोटी 13 लाखांची उलाढाल झाली.

कुशल बंदींना दिवसा 61 रुपये

कारागृहात 40 पुरुष बंदी लाडू निर्मिती विभागात कार्यरत आहेत. देवस्थान समितीकडून येणार्‍या मागणीप्रमाणे दिवसाकाठी 7 ते 8 हजार लाडू बनवले जातात. शनिवार, रविवार तसेच देवीच्या वारांना लाडूची मागणी 10 हजारांच्या पुढे जाते. हे लाडू बनविण्यासाठी कुशल व अकुशल असे बंदी निवडले जातात. कुशल बंदींना दिवसा 61 रुपये, अकुशल बंदींना दिवसा 48 रुपये पगार अदा केला जातो. मागणी वाढल्यानंतर जादा काम केल्यास त्यांना जादा मानधनही दिले जाते.

अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांना आधीन राहून लाडूंची निर्मिती केली जाते. तसेच पावित्र्यामध्येही कोणतीच तडजोड केली जात नाही. यातून मिळणारा महसूलही शासन तिजोरीत जमा होत आहे.
– पांडुरंग भुसारे, कारागृह अधीक्षक

Back to top button