संत तुकाराम बीज : तुकोबांच्या अभंगांवरून साकारली 400 चित्रे | पुढारी

संत तुकाराम बीज : तुकोबांच्या अभंगांवरून साकारली 400 चित्रे

कोल्हापूर; प्रवीण मस्के :  इतिहासातील कर्तृत्ववान संत तुकाराम महाराज यांची काही निवडक रूपे चित्र-शिल्पकार भास्कर हांडे यांनी तुकोबारायांच्या अभंगांवरून वास्तव चित्ररूपाच्या माध्यमातून साकारली आहेत. शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम महाराज अध्यासना केंद्रात लवकरच यातील काही चित्रे ठेवली जाणार आहेत.

इतिहासातील संत, महापुरुषांची व्यक्तिचित्रे उपलब्ध नाहीत, तसेच अद्याप समाजास माहीतही नाहीत. चित्रकार हांडे यांनी तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे ‘तुझे रूप-माझे देणे’ या प्रकल्पांतर्गत 400 हून अधिक चित्र-शिल्पांची मालिका नव्याने तयार केली आहे. पुणे परिसरातील भंडारा, भामगिरी डोंगरातील गुन्हा, हैबतबाबा यांची गाथा यासह विविध ठिकाणांहून 20 चित्रे संकलित केली आहेत. यातील काही चित्र वास्तव असून, इतर चित्रकारांनी साकारलेली आहेत.

देहूपासून भामगिरी डोंगर उत्तरेला 20 कि.मी. अंतरावर असणारे संत तुकाराम महाराजांचे आवडते ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका गुहेत त्यांचे थाकटे बंधू कान्होबाच्या साक्षीने कोरलेले एक शिल्प आहे. गुहेत कोरलेले हे शिल्प सर्वात प्राचीन असून, याला विशेष महत्त्व आहे. 1990 पर्यंत हे शिल्प दगडात उठाव पद्धतीत कोरले होते. गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला हे उठाव शिल्प आहे. तिच्या द्वाराजवळील जागा कोरलेली असून, 10 फूट लांब 6 फूट रुंद व 6 फूट उंच असा आकार आहे. वाघ, विंचू, सर्प तुकाराम महाराजांच्या आजूबाजूला पाच व अंगाखांद्यावर आहेत. तुकोबा विठ्ठल नामस्मरणात तल्लीन आहेत, हीच साक्षात्काराची अवस्था आहे. त्याचे रूप दगडात उठाव शिल्पाच्या रूपाने आकारबद्ध केलेले आहे. आजतागायत भक्तांनी प्रेरणास्थान म्हणून सांभाळले असून, सुरक्षित ठेवले आहे. 1990 पर्यंत हे उठाव शिल्प रंगविलेले नव्हते. 21 व्या शतकातील पहिल्या दशकात येथे बर्‍याच प्रमाणात बदल झालेले आहेत.

तुकोबाच्या रूपाचे हे एकमेव उदाहरण त्यांच्या अस्तित्व काळातील मानता येईल. हेच उठाव शिल्प तुकोबाच्या चेहर्‍याचा व देहयष्टीचा प्रमाणबद्ध नमुना उपलब्ध आहे. चाकण येथील कोष्टीने 175 वर्षांपूर्वी जाजमवर विणलेले चित्र काढले आहे. ते संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे वडील श्रीधरबुवा मोरे यांनी देहू येथे लावले आहे. 1833 च्या आसपासच्या काळातील हैबतबाबांच्या पोथीवर संत तुकाराम महाराज यांचे दुर्मीळ चित्र आजही देहू येथे पाहावयास उपलब्ध आहे. पंढरपूर येथील गोपाळपुरा येथील तुकराम महाराज, देहू येथील मंदिरातील विठ्ठल मंदिरातील मुखवटा, विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांनी काढलेले चित्र, पंढरपूर येथील तुकाराम महाराज मंदिरातील संगमरवरी मूर्ती, तुकाराम महाराज यांचे वास्तववादी चित्रे पुण्यातील वैश्विक कला पर्यावरण या संग्रहालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. याच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांची चित्रे समाजासमोर आली आहेत.

संत तुकाराम महाराज यांना भावलेला निसर्ग त्यांनी अभंगात मांडला आहे. चित्रकाराच्या नजरेने दिसले ते चित्रांच्या रूपातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अभंगांवरील 400 हून अधिक चित्रे साकारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात यापूर्वी झालेला नाही. संत तुकाराम महाराज यांचे प्रमाणित व्यक्तिचित्र पाहावयास मिळत नाही. त्यांच्या दोन पुस्तकांतून संत
तुकाराम महाराज यांच्यावरील चित्रे साकारली आहेत.
– भास्कर हांडे, चित्र-शिल्पकार

Back to top button