डिजिटल युगातही वृत्तपत्रे प्रभावशााली : रंजना देव शर्मा | पुढारी

डिजिटल युगातही वृत्तपत्रे प्रभावशााली : रंजना देव शर्मा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  आजच्या डिजिटल युगातही वृत्तपत्रे अत्यंत प्रभावशाली असल्याचे केंद्रीय संचार ब्युरो, दिल्ली मुख्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक रंजना देव शर्मा यांनी सांगितले. श्रीमती शर्मा तसेच माहिती प्रसारण मंत्रालय पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनीदीपा मुखर्जी यांनी बुधवारी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची दैनिक ‘पुढारी’ कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी शर्मा बोलत होत्या.

दैनिक ‘पुढारी’च्या वाटचाली विषयी आणि ‘पुढारी’च्या सामाजिक कार्याची आपल्याला माहिती असल्याचे शर्मा यांनी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी डॉ. जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

डिजिटल जमाना असला, तरी वृत्तपत्रे प्रभावशाली आहेत. विशेषत: भाषिक वृत्तपत्रांचा प्रभाव मोठा असल्याचे सांगून शर्मा म्हणाल्या की, ज्या ज्या वेळी आम्ही देशाच्या विविध भागांचा दौरा करतो त्यावेळी आम्हाला हे जाणवले आहे. त्यामुळे वृत्तपत्रांचे महत्त्व कायम आहे. कोल्हापूरला आल्यानंतर आम्हाला येथील सुबत्ता जाणवली आहे. प्रत्येक शहराचे, गावाचे एक वातावरण असते. आम्हाला कोल्हापुरात ही सर्व सुबत्ता अनुभवता आली. हे महालक्ष्मीचे स्थान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

‘पुढारी’चे सामाजिक काम तसेच जगातील उत्तुंग रणभूमीवर ‘पुढारी’ने उभारलेले सियाचीन हॉस्पिटलच्या कार्याचा गौरव करून श्रीमती शर्मा म्हणाल्या, जवानांसाठी हे हॉस्पिटल जीवनदायी ठरत आहे.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र सधन असल्याचे सांगून, येथील दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. सहकारातून विशेषतः साखर उद्योगासह अन्य क्षेत्रांनी ही समृद्धी आणल्याचे सांगितले. श्रीमती मोनीदीपा मुखर्जी यांनी यावेळी ‘पुढारी’च्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

Back to top button