रंगोत्सवाची जय्यत तयारी! अवघे कोल्हापूर सजले : नैसर्गिक रंगांना मोठी मागणी

रंगोत्सवाची जय्यत तयारी! अवघे कोल्हापूर सजले : नैसर्गिक रंगांना मोठी मागणी
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  होळीनंतर आता रंगपंचमीचे वेध लागले आहेत. बाजारपेठेत विविध रंग, पिचकारी, फुग्यांनी बाजारपेठ सजू लागली आहे. रविवारी येणारी रंगपंचमी साजरी करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. 'वीकेंड' असल्याने अनेकांनी बाहेरगावी जाण्याचेही प्लॅनिंग केले असून गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरीकडे जाण्याकडे अधिक कल दिसून येतो आहे.

नैसर्गिक रंग, खड्यांचे रंग बाजारात उपलब्ध आहेत. बालचमूंचे आकर्षण असणारे फुगे, पिचकार्‍याही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आहेत. 30 रुपयांपासून तब्बल 500 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकार्‍या बाजारात आल्या असून खरेदीला गर्दी वाढत आहे. नैसर्गिक रंगही 10 रुपये ते 30 रुपये शंभर ग्रॅम या दराने उपलब्ध आहेत तर खड्यांचे डबीतील रंग 30 रुपये तोळा ते 50 रुपये तोळ्यावर विक्रीसाठी आले आहेत.

जपा शरीराला अन् पर्यावरणालाही

झेंडू, पारिजातक, पळस, काटेसावर, हिरडा, बेहडा, आवळा, कडूनिंब, शेंदरी, बहावा, जास्वंद, गुलाब, मेहंदी, गोकर्ण यापासून रंग बनवू शकतो. यापासून बनवलेले रंग पर्यावरणपूरक व आरोग्यदायी समजले जातात. यापासून मानवी शरीराला अपाय किंवा पाणी प्रदूषणाचीही शक्यता नसते. यामुळे शरीराला व पर्यावरणाला जपणारे रंग वापरणे अधिक हिताचे ठरणार
आहे. अनेक सामाजिक संस्थांकडून अशा रंगांची विक्री केली जाते. पर्यावरणपूरक रंग बनविण्याची कार्यशाळाही या पार्श्वभूमीवर घेण्यात आली.

वनस्पतीजन्य रंग बनविण्याची कार्यशाळा; वीकेंड प्लॅनचीही लगबग

वनस्पतीजन्य रंगांचा फायदा म्हणजे ते आरोग्यदायी आहेत. हे रंग कोरडे खेळता येत असल्याने पाण्याचा कमीत कमी वापर करता येईल. सुवासिक असून सहज उपलब्ध आहेत. फुलांपासून, पानांपासून ते स्वत: तयार करता येतील. देवघरातील निर्माल्यातूनही आपण अशा रंगांची निर्मिती करू शकतो. केवळ रंगपंचमी नव्हे तर लग्न समारंभावेळी हळद खेळणे, अक्षता रंगविणे, गणेशोत्सवावेळी गणेशमूर्ती रंगविणे अशांसाठीही या रंगाचा वापर केल्यास पर्यावरण रक्षणही आपोआप आपल्या हातून घडेल.
– अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्गमित्र परिवार

त्वचा, कान, नाकाला जपा

रंगपंचमीला केमिकलयुक्त रंगांचा वापर घातक ठरू शकतो. कानामध्ये, डोळ्यामध्ये, नाकावाटे श्वसनमार्गात असे रंग गेल्यास मोठी हानी होऊ शकते. तसेच त्वचेला अ‍ॅलर्जी होऊन पुरळ, खाज सुटू शकते. अशावेळी नैसर्गिक रंग वापरणे अधिक हिताचे ठरेल.
– डॉ. गणेश ढवळशंख, त्वचारोग तज्ज्ञ

रंग डोळ्यात गेल्यास स्वच्छ पाण्याने डोळे धुऊन डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जावे. घरच्या घरी उपाय करण्यात किंवा एखादा ड्रॉप सोडून थांबू नये अन्यथा मोठा धोका संभवतो. तसेच पाण्याने सहज धुता येतील असेच रंग वापरावेत.
– डॉ. सुजाता वैराट, नेत्र शल्यचिकित्सक, सीपीआर हॉस्पिटल

केमिकलयुक्त रंगांचे परिणाम

  • डोळ्याला कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका
  •  रंग डोळ्यात गेल्यास बुब्बुळाला इजा
  • संसर्ग झाल्यास द़ृष्टीपटलावर परिणाम
  •  अंगावर पुरळ, खाज सुटणे
  • नाकावाटे फुफ्फुसात गेल्यास धोका
  •  कानावाटे गेल्यास श्रवणशक्तीवर परिणाम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news