कोल्हापूर : ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेत बहुमजली इमारतीला मान्यता | पुढारी

कोल्हापूर : ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेत बहुमजली इमारतीला मान्यता

कोल्हापूर, अनिल देशमुख : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेत आता बहुमजली बांधकाम करता येणार आहे. केंद्र शासनाने शहरी भागातील योजनेसाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापूरसह शहरी भागातील एकाच कुटुंबातील पात्र असलेल्यांना याचा लाभ होणार आहे.

‘प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागेवर पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. जून 2015 मध्ये सुरू झालेली ही योजना 2022 पर्यंत होती. मात्र, ती आता 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या योजनेमध्ये 2019 साली सुधारणा करण्यात आली असून त्याद्वारे पात्र कुटुंबातील कोणतीही सज्ञान कमवती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आली आहे. मात्र, एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक पात्र लोक आणि सामाईक जागा, एकापेक्षा अधिक पात्र लोकांसाठी अपुरी पडणारी जागा यामुळे या योजनेचा लाभ अनेकांना घेता येत नव्हता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सर्वांसाठी घरे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, कुटुंबातील एकाच्याच नावे जागा, सामाईक जागा या योजनेत अडसर ठरत होत्या. यामुळे पात्र असूनही केवळ जागेअभावी अनेकांना या योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे चित्र आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या 50 व्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाने एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक लोक पात्र असतील आणि त्यांची सामाईक जागा असेल तर त्यावर लाभार्थ्यांच्या संख्येनुसार बहुमजली इमारत बांधण्यास मान्यता दिली आहे. तसे आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाने काढले आहेत.

या निर्णयाचा राज्यातील हजारो नागरिकांना फायदा होणार आहे. केवळ कुटुंबातील एकाच्याच नावे असलेल्या तसेच सामाईक असलेल्या जागेमुळे हक्काच्या आणि पक्क्या घरापासून वंचित असणार्‍या नागरिकांना आता हक्काचे घर मिळणार आहे.

Back to top button