कोल्हापूर : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बिंदू चौकात उभारणार व्हर्टिकल गार्डन | पुढारी

कोल्हापूर : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बिंदू चौकात उभारणार व्हर्टिकल गार्डन

कोल्हापूर, आशिष शिंदे : वाढत्या वायू प्रदूषणामुळे कोल्हापूरचा समावेश देशातील सर्वाधिक प्रदूषित 131 शहरांमध्ये झाला आहे. शहराची ढासळती वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने शहराचा समावेश राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमामध्ये केला आहे. याअंतर्गत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बिंदू चौक येथे व्हर्टिकल गार्डन उभारण्यात येणार आहे. शहरातील सर्वाधिक प्रदूषित दाभोळकर कॉर्नर परिसरात एअर फिल्टरेशन सिस्टीम कार्यान्वित केली असून शहरातील 5 ठिकाणी कारंजे बसवण्यात येणार आहेत.

देशातील सर्वाधिक प्रदूषित 131 शहरांमधील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत. कोल्हापुरातील वायूप्रदूषण नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या वतीने महापालिकेला निधी देण्यात येतो. 2019 ते 2020 या कालावधीसाठी 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानंतर 2020 ते 2021 साठी 76 लाखांचा तर 2021 ते 2022 साठी नुकताच 9 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

आतापर्यंत महापालिकेच्या वतीने 44 लाखांचा निधी वापरण्यात आला आहे. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी जनजागृती याशिवाय इतर प्रस्तावित प्रदूषण नियंत्रण उपक्रमांसाठी आजअखेर 20 लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे तर 24 लाखांच्या वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत.

असे काम करते एअर फिल्टरेशन सिस्टीम

शहरातील वायू प्रदूषणाच्या आलेखावरून दाभोळकर कॉर्नर शहरातील सर्वात प्रदूषित केंद्र आहे. यामुळे या परिसरात एअर फिल्टरेशन सिस्टीम लावण्यात आल्या आहेत. येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात धुलिकण पसरतात. या परिसरात त्याचे प्रमाणही जास्त आहे. हवा शुद्धीकरण मशिन्स प्रदूषित हवा खेचून घेऊन (पार्टिक्युलेट मॅटर 2.5 व पार्टिक्युलेट मॅटर 10) शुद्ध हवा वातावरणात सोडतात यामुळे वायू प्रदूषण काही प्रमाणात नियंत्रणात येण्यास मदत होते.

एअर फिल्टरेशन सिस्टीम कार्यान्वित

दाभोळकर कॉर्नर सिग्नलच्या चार ठिकाणी एअर फिल्टरेशन सिस्टीम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत या मशिन्सचे ट्रायल रन सुरू आहे. येत्या दहा दिवसांमध्ये याचा अहवाल येणार आहे.

व्हर्टिकल गार्डनमुळे प्रदूषण नियंत्रणास होईल मदत

शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी व्हावे आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी महापालिकेच्या वतीने बिंदू चौक येथे व्हर्टिकल गार्डन तयार करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. या गार्डनमुळे प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत मिळेल तसेच शहराच्या सौंदर्यात देखील भर पडेल, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button