कोल्‍हापूर : निवडणूक आयोगाचा शस्‍त्रासारखा वापर करून सेनेचे अस्‍तित्‍व संपवता येणार नाही : संजय राऊत | पुढारी

कोल्‍हापूर : निवडणूक आयोगाचा शस्‍त्रासारखा वापर करून सेनेचे अस्‍तित्‍व संपवता येणार नाही : संजय राऊत

सरुड : पुढारी वृत्तसेवा सूर्य, चंद्राप्रमाणे शिवसेना देखील अमर आहे. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगाचा शस्त्रासारखा वापर करून या सेनेचे अस्तित्व कदापी संपवता येणार नाही. महाराष्ट्राच्या हत्येची सुपारी देणारे आणि घेणारे या दोघांनाही मातीत मिसळण्याचे सामर्थ्य महाराष्ट्रात आहे. हे शिंदे मिंधे कोण आहेत.., लफंगे, लुटेरे आहेत. गांडूळ आहेत. पावसाळ्यानंतर हे सर्व संपणार आहेत. शिवसेना पक्षाच्या खांद्यावर बसून भाजपने राज्यात गड उभे केले. याच शिवसेनेच्या खांद्यावरून भाजपची अंत्ययात्रा लवकरच निघणार आहे. अशा शेलक्या शब्द बाणांनी खासदार संजय राऊत यांनी सरुड (ता. शाहूवाडी) येथील शिवगर्जना संवाद मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. सत्यजित पाटलांसारखा एकतरी निष्ठावान या मिंधे गटात दाखवा. हे टेस्ट ट्यूब बेबी आहेत, असा त्यांनी पुनरुच्चार करून शिंदे गटावर टीका केली.

मेळाव्याच्या प्रारंभी शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा खा. संजय राऊत यांच्या हस्ते भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. माजी आ. बाबासाहेब पाटील हे या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
खा. राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस तुमचे उपमुख्यमंत्री पद औटघटकेचे आहे. मिंद्यांना तर आम्ही मुख्यमंत्री मानतच नाही. पुण्याच्या दोन्ही पोट निवडणुकीत डुप्लिकेट शिवसेनेचा बुरखा फाटला आहे. यापुढे गल्ली पासून दिल्लीपर्यंत महाविकास आघाडीचेच राज्य दिसेल. सगळ्या चौकशा करूनही यंत्रणांना आमच्या बँक पासबुकावर काहीच सापडले नाही. मुंबई महाराष्ट्राची आहे. यासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. प्रत्येक मुंबईकराला विचाराल तर शिवसेनेचा जन्म मुंबई वाचविण्यासाठी झाल्याचे समजेल. सत्तेची समान वाटणी ठरली असताना उद्धव ठाकरे यांना तुम्ही खोटे ठरविता तर मग ही टेस्ट ट्यूब बेबी मांडीवर कशासाठी घेऊन बसला आहात. असा उपरोधिक टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

निवडणूक आयोगाच्या एकतर्फी निर्णयाची त्यांनी निर्भत्सना केली. महाराष्ट्राला लुटायचं आणि मस्तवाल दिल्लीश्वरांच्या पायाशी लोटांगण घालायची बुद्धी या लाफग्यांना सुचली. हे सर्व ४० दगड निष्ठेच्या सागरात बुडणार आहेत. राजकीय इतिहास याचा साक्षीदार असेल. शिवसेना आहे, पुढेही तेजस्वी किरणांप्रमाणे तळपत राहील. जिंकू ते आम्हीच..! कंस मामा गेला.., मोगँम्बोही जाईल.. चिंता सोडा आणि नेटाने कामाला लागा, असा जाता जाता शिवसैनिकांना त्यांनी सल्लाही दिला.

जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करीत स्वतःची सोललेली कातडी वाचविण्यासाठी मिंद्यांनी गद्दारी केली आहे. शिवसैनिक, मतदार त्यांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. ठाकरे विचाराने भारलेला हा कोल्हापूर जिल्‍हा आणि शाहूवाडी तालुका आहे.

माजी आ. सत्यजित पाटील म्हणाले, शिवसेना फाटाफुटीचा या तालुक्यातील जनतेवर तिळमात्र परिणाम झाला नाही. मात्र सद्या आमिष दाखवून दिशाभूल करून पक्षात प्रवेश करण्याची गळ घातली जात आहे. लोकशाहीचा गळा घोटाण्याचं पातक करणाऱ्या अशा संधीसाधूंपासून सावधानता बाळगा, पैशाच्या जोरावर पदांचा लिलाव करणाऱ्यांना ओळखा, असे आवाहन केले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेची चिरफाड करीत त्यांनी राजकारण संपवले आणि रस्त्यावर आलो तरी बेहत्तर परंतु उद्धव ठाकरे यांची सोबत सोडणार नसल्याचे त्यांनी आवेशात स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांची भाषणे झाली. पक्षप्रवक्ते लक्ष्मण हाके, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, हंबीरराव पाटील-भेडसगांवकर, विधानसभा संपर्कप्रमुख आनंद भेडसे, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, माजी सभापती विजय खोत, ॲड. विजय पाटील, तालुकाप्रमुख दत्तात्रय पवार आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्थर रोड जेलच्या कैद्यांमध्येही भाजप विरोधी संताप

महाशक्तीच्या कपट कारस्थानामुळे तुरुंगातील ३०२ आणि ३०७ बराकीत आपण १०३ दिवस काढल्याचे सांगत तिथंही निवडणूक घेतली असती तर शिवसेनेचा विजय झाला असता. इतकी चीड फडणवीस आणि शिंदे विरोधात जेलच्या कैद्यांमध्ये देखील निर्माण झाल्याची आठवण राऊतांनी सांगितली.

लोकांची फर्माईश आणि राऊतांची पेशकश

नारायण..कोंबडी अशी समोरून लोकांची फर्माईश होत असताना ‘त्या कोंबडी चोराची इतकी पिसे काढून झालीत, त्याच्यात काहीच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे तो आता फडफडत आहे, अशी पेशकश करीत राऊत यांनी खा. राणे यांचा खरपूस समाचार घेतला.
भाषणाच्या सुरुवातीलाच आ. कोरेंवर टीकास्त्र

वारणेचा वाघ माहिती होता. वारणेच्या सडलेल्या नोटा माहीत नव्हत्या. लोकशाही आणि राजकारणात सावकारकीला स्थान नाही. पैशांची मदमस्ती फारकाळ चालणार नाही. शिवसैनिक त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहेत. असा आमदार विनय कोरे यांचा नामोल्लेख टाळून राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला.

हेही वाचा : 

Back to top button