अंबाबाई मंदिर कॉरिडोरसाठी एक हजार कोटींचा प्रस्ताव | पुढारी

अंबाबाई मंदिर कॉरिडोरसाठी एक हजार कोटींचा प्रस्ताव

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरासाठी कॉरिडोर केला जाणार आहे. याकरिता सुमारे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लवकरच तो राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. हा कॉरिडोर मंजूर झाला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली, तर अंबाबाई मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे.

अंबाबाई मंदिरात येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंदिरात गेल्या पाच वर्षांत दैनंदिन भाविकांची सरासरी संख्या 50 ते 75 हजारांवर गेली आहे. सुट्टी, सण आणि उत्सव काळात ही संख्या किती तरी पटीने वाढत आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे. यामुळे भाविकांना आवश्यक त्या सुविधा देता याव्यात तसेच सुरक्षिततेच्या द़ृष्टीने अंबाबाई मंदिर कॉरिडोर साकारला जाणार आहे. त्याचा एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर अशा मंदिराच्या चारही बाजूंच्या सुमारे 1 लाख 20 हजार चौरस फूट जागेवर हा कॉरिडोर साकारणार आहे. मंदिराच्या चार अथवा तीन बाजूंना मार्केट टॉवर उभारले जातील. यामध्ये सर्व वस्तू भाविकांना उपलब्ध होणार आहेत. एका टॉवरमध्ये अन्नछत्रही असेल. मंदिर आवारातील प्रवेश प्रशस्त आणि भव्य असेल. हा सर्व परिसर मोकळा झाल्याने दर्शन रांगही प्रशस्त असेल. या दर्शन मार्गावर भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, मार्केट टॉवरमध्ये विस्थापित होणार्‍या सर्व व्यापार्‍यांचा समावेश करून घेण्याचा विचार आहे. जे मालक असतील, त्यांना मालकी हक्काने आणि जे कूळ असतील, त्यांना भाडेतत्त्वावर गाळे उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे. या मार्केट टॉवरचा लूकही मंदिराला साजेशा असाच असणार आहे.

या कॉरिडोरमध्ये समाविष्ट होणार्‍या काही मिळकतींमध्ये जुने वाडे आहेत, त्या ठिकाणी जुनी मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांचे संवर्धन करून तिही खुली केली जाणार आहेत. याखेरीज सुरक्षिततेच्या द़ृष्टीने या कॉरिडोरमध्ये विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत.

जोतिबा प्राधिकरणाचाही हजार कोटींचा प्रस्ताव

नव्याने स्थापन झालेल्या जोतिबा प्राधिकरणाचाही एक हजार कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केल्याचे समजते. संपूर्ण जोतिबा परिसराचा विकास तसेच पन्हाळा-जोतिबा मार्गावर रोप-वे आदींचा यामध्ये समावेश आहे. प्राधिकरणात पूजा-विधी, स्वच्छता आदी विविध प्रकारचे सात न्यास स्थापन करण्यात आले आहेत. त्याद्वारे प्राधिकरणाचे कामकाज होणार आहे.

Back to top button