अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा पाठपुरावा | पुढारी

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा पाठपुरावा

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा दोन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दि. 22 नोव्हेंबर 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासमोर कोल्हापुरात हॉटेल व्हिक्टर पॅलेस येथे त्याचे सादरीकरण केले. तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने देशमुख यांनी कोल्हापूर तीर्थक्षेत्र योजनेसाठी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली. या सादरीकरणावेळी जिल्ह्यातील सर्व पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

नांदेड येथे गुरू-दा-गद्दी सोहळ्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. हा आराखडा ज्यांनी तयार केला, त्या फोर्टेस कंपनीचे श्री कुमार हे यावेळी उपस्थित होते. त्यांनीच तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा तयार केला आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. चव्हाण यांनी दि. 5 मार्च 2010 रोजी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण झाले. तेथून चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले व तेथील बैठकीत या आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल, असे जाहीर केले. मात्र, चव्हाण पुढे पायउतार झाले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आले. त्यांनी दि. 12 मार्च 2011 रोजी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेव्हा त्यांच्यासमोरही याचे सादरीकरण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची घोषणा केली.

दि. 3 जानेवारी 2015 रोजी कोल्हापुरात झालेल्या ‘पुढारी’च्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला निधी द्यावा, अशी मागणी केली. तेव्हा पंतप्रधानांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी स्वत:साठी काही मागितले नाही. मात्र, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी मागितला. तो प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस सोडवतील, असे जाहीरपणे सांगितले.

मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी 90 कोटी रुपये मंजूर केले. त्यातून काही कामे सुरू झाली. मात्र, पूर्ण विकास आराखडा मंजूर होण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पाठपुरावा केला.

तीर्थक्षेत्र विकासकामासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ‘पुढारी’ कार्यालयात येऊन मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी सुमारे तीन तास चर्चा केली. त्यावेळी त्यांच्याकडे आराखडा नसल्याने त्यांनी केलेल्या मागणीनुसार डॉ. जाधव यांनी तीर्थक्षेत्र विकासाचा संपूर्ण आराखडा त्यांच्याकडे सोपवला. त्यानंतर केंद्र व राज्य पातळीवरील संबंधितांशी चर्चा होऊन तीर्थक्षेत्र विकासाचे काम मार्गी लागत आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडोर हा त्याचाच भाग आहे.

Back to top button