कोल्हापूरच्या 100 गूळ उत्पादकांना मिळणार जीआय मानांकन | पुढारी

कोल्हापूरच्या 100 गूळ उत्पादकांना मिळणार जीआय मानांकन

कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : रंग, चव आणि टिकाऊपणा यामुळे कोल्हापूरचा गूळ जगाच्या बाजारपेठेत पोहोचला आहे. ही बाजारपेठ आणखी भक्कम आणि विश्वासू करण्यासाठी जिल्ह्यातील गूळ उत्पादकांना योग्य प्रशिक्षण आणि मोठी बाजारपेठ मिळवून देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे कोल्हापुरी गुळाचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचणार आहे.

जिल्हा प्रशासन, कृषी पणन मंडळ आणि बाजार समितीच्या वतीने जिल्ह्यातील 100 गूळ उत्पादक शेतकर्‍यांना भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या नोंदणीसाठी कृषी पणन मंडळाच्या मार्केट यार्डातील कार्यालयात जीआय कक्ष स्थापन केला आहे.

कोल्हापुरी गुळाच्या उत्पादनात सातत्य राहावे, शेतकर्‍यांना गूळ उत्पादनातून चार पैसे जादा मिळावेत, यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या गुळाचा आपणच व्यवसाय केला पाहिजे, यासाठी दर्जेदार गूळ उत्पादन महत्त्वाचे आहे. तो गूळ परदेशी बाजारपेठेत गेला पाहिजे, यासाठी संबंधितांकडे भौगोलिक मानांकन (जीआय) असले पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने कृषी पणन मंडळामार्फत शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

वेबसाईट, पॅकिंगसाठी तीन लाख अनुदान

जीआय मानांकन घेतलेल्या शेतकर्‍यांना गुळाचा दर्जा वाढविणे, पॅकिंग, मार्केटिंग, अपेडाशी संपर्क आदी मुद्द्यांवर प्रशिक्षणांत भर दिला जाणार आहे. तसेच जे गूळ उत्पादक शेतकरी ब—ँडिंग, गुळाबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करतील आणि पॅकिंगही करतील, अशा शेतकर्‍यांना मंडळाकडून तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी कृषी महोत्सवांचे आयोजन केले जाईल, अशा महोत्सवांमध्ये गूळ उत्पादक शेतकर्‍यांना गुळाचा स्टॉल लावण्यासाठी एका शेतकर्‍यास तीन हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

‘अपेडा’ची मदत घेणार

कृषी पणन मंडळाकडे नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांची सर्व माहिती केंद्र सरकारच्या अपेडा या संस्थेकडे पाठविण्यात येणार आहे. अपेडाकडून गूळ निर्यातीसाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येईल. निर्यातीसंदर्भात ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे, त्याबाबतची माहितीही शेतकर्‍यांना दिली जाणार आहे.

Back to top button