कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : भटक्या कुत्र्यांच्या हल्लात शनिवारी येथील नागूबाई अर्जुन कांबळे (72) या वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास घडली. यामुळे खळबळ उडाली आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. जुना शिवाजीनगर पोलिस ठाण्याजवळील बीएसएनएल

कार्यालय समोर राहणार्‍या नागूबाई या शनिवारी पहाटे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या पिछाडीस असणार्‍या हनुमान मंदिरकडे चालल्या होत्या. यावेळी सुमारे 25 ते 30 मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या अंगावर कुत्री धावून आली. त्यामुळे नागरिकांनाही तेथून पळ काढावा लागला.

कुत्र्यांनी अक्षरशः त्यांचे लचके काढले होते. जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Back to top button