कोल्हापूर : डिजिटल डिटॉक्स मोहीम बनतेय लोकचळवळ | पुढारी

कोल्हापूर : डिजिटल डिटॉक्स मोहीम बनतेय लोकचळवळ

कोल्हापूर, तानाजी खोत : सुरुवातीला कौतुकाचा विषय असलेला मोबाईल फोन आता मानसिक आरोग्यासाठी गंभीर धोका झाला आहे. स्मार्टफोनच्या व्यसनात अडकलेलेल्या मुलांची संख्या मोठी असून त्यामुळे संपूर्ण कुटुंबच त्रस्त आहेत. ‘डिजिटल टॉक्सिसिटी’ ही आजच्या काळातील सगळ्यात मोठ्या समस्येवर सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या मोहित्यांचे वडगाव या गावाने मार्ग काढला आहे. या गावापासून प्रेरणा घेऊन राज्यातील 10 गावे आणि एका नगरपरिषद क्षेत्रात रोज सायंकाळी दोन तास मोबाईल फोन आणि टीव्हीला सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोव्हिड साथ ठरली ट्रिगर पॉईंट

कोव्हिड काळात बहुतांश शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल आले. अभ्यास करता करता मुलांना स्मार्टफोनची इतर फंक्शने माहीत झाली, सुरुवातीला टिकटॉक, नंतर शॉर्टस् आणि आता रील्सच्या माध्यमातून त्यांच्या मन आणि मेंदूचा ताबा मोबाईलने घेतला.

…अशी सुचली आयडिया

मुलं मोबाईलवर आणि महिला सीरियलमध्ये असे चित्र घरोघरी दिसायला लागले. घरात टीव्ही सीरियल्स पाहायची आणि त्यावर चर्चा, डोक्यात दुसरा विषय नाही. संवाद संपला, विसंवाद वाढला. घरातील मुले वारंवार सांगूनदेखील ऐकत नव्हती. अभ्यासात चांगली गती असलेली मुले मागे पडायला लागली. आजूबाजूला सगळीकडे तीच परिस्थिती, पाहुण्यांमध्ये मित्रांमध्ये तीच अवस्था यावर काही करणे गरजेचे वाटले.

…असा होता डिजिटल डिटॉक्स कार्यक्रम

गावात सायंकाळी सात वाजता सायरन वाजणार त्यानंतर प्रत्येक घरात मोबाईल फोन आणि टीव्ही संच बंद होणार. या काळात मुले अभ्यास करणार, मोठी माणसे एकमेकांशी गप्पा मारतील, मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवतील. वाचन करतील. सामाजिक उपक्रम, खेळ यात सर्व सक्रिय सहभागी होतील.

…असा झाला फायदा

शैक्षणिक गुणवत्तेत 6 ते 7 टक्के सुधारणा झाली. मुलांना वाचनाची आणि लेखनाची आवड निर्माण झाली. चिडचिडेपणा कमी होऊन मुलांची शारीरिक क्षमता सुधारली. मैदानी खेळातील रुची वाढली. मुले मैदानावर दिसायला लागली. सीरियल्सवरील चर्चा बंद होऊन आपल्या वैयक्तिक समस्यांची चर्चा व्हायला लागली, परस्परांत प्रत्यक्ष संवाद वाढला.

…या गावांत मोबाईल, टीव्ही बंदीचा प्रयोग

तासगाव तालुक्यातील मांजर्डे, सावर्डे, मिरज तालुक्यातील कर्नाळ, माढा नगरपंचायत, ता.माढा, जिल्हा सोलापूर, नागोळी तालुका पंढरपूर, कराड तालुक्यात वाघाव यवतवमाळ जिल्ह्यात बार्शी हातकणंगले तालुक्यात पेठवडगाव (नगरपालिका क्षेत्र)

अंबपमध्ये वाजला टीव्ही, मोबाईल बंदचा भोंगा

कासारवाडी, पुढारी वृत्तसेवा : मुलांना मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी अंबप (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत मोबाईल व टीव्ही बंद ठेवण्याचा निर्धार करत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीपीएएस प्रणाली सुरू होणार आहे.

यासाठी लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने व माजी पंचायत समिती सदस्य विकास माने यांच्या पुढाकाराने हातकणंगले तालुक्यात ग्रामीण भागात अंबप येथे प्रथमच ठराविक वेळेसाठी टीव्ही, मोबाईल बंदचे प्रबोधन केले. सायंकाळी सात वाजता भोंगा वाजवला जाईल यानंतर सर्वांनी साडेआठ वाजेपर्यंत घरातील टीव्ही मोबाईल बंद करण्याचा निर्धार केला आहे. भोंगा वाजवून उपक्रमाची सुरुवात केली.

Back to top button