

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले जनआरोग्य योजना ही लोकांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने बनविली असून, शासन या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. त्यामुळे काही लोक याचा गैरफायदा घेत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच योजनेतून उपचार घेणार्या नागरिकांचा दर तीन महिन्यांतून मेळावा घेऊन त्यांची विचारपूस केली जाईल. त्यांच्याकडून आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी बैठकीत दिली. शासकीय विश्रामगृहावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्यमित्र उपस्थित होते.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, योजना खूप चांगली आहे. अंमलबजावणीतील अडथळे दूर केले पाहिजेत. लोकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन जर कोण त्यांना लुबाडत असेल, तर अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे सरकारी यंत्रणांकडूनसुद्धा यावर अंकुश ठेवला पाहिजे. लोकांना सेवा मिळते की नाही, हे आपण पाहिले पाहिजे. जी रुग्णालये दुहेरी फायदा घेत असतील अशा रुग्णालयांवर नजर ठेवली जाईल, जर लोकांची तक्रार आली; तर कोणत्याही परिस्थितीत त्यांची गय केली जाणार नाही. अशी रुग्णालये या योजनेतून वगळण्यात येतील. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या.
महात्मा फुले योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रोहित खोलखुंबे यांनी योजनेची माहिती दिली. 80 आरोग्यमित्रांद्वारे त्यांच्यावर अंकुश ठेवला जात असल्याचे सांगितले. यावेळी आरोग्यमित्रांनी लोकांसाठी काम करावे, लोकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता. त्यामुळे रुग्णालयात उपचार होतात की नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यावेळी खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. (समाप्त)