तपास यंत्रणेला सहकार्य करा : किरीट सोमय्या | पुढारी

तपास यंत्रणेला सहकार्य करा : किरीट सोमय्या

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेतील माहितीबाबत तपास यंत्रणेला सहकार्य करावे, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांना सांगितल्याचे समजते. जिल्हा बँकेच्या संचालकांनी सोमय्या यांची भेट घेऊन आरोप करण्यापूर्वी बँकेची कार्यपद्धती समजून घ्यावी व बँकेची बदनामी टाळावी, असे सांगितले.

जिल्हा बँकेवर ईडीने छापा टाकल्यानंतर गुरुवारी कोल्हापूर दौर्‍यावर आलेले सोमय्या काय आरोप करणार, याकडे लक्ष लागून राहिले होते. जिल्हा बँकेस ते भेट देणार होते. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी बँकेच्या परिसरात केवळ पोलिसच होते. आ. मुश्रीफ यांच्या आवाहनास प्रतिसाद देत एकही कार्यकर्ता बँकेकडे फिरकला नाही.

सोमय्या सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा बँकेत आले. त्यापूर्वी सुमारे तासभर अगोदर सुरक्षा यंत्रणेतील आठ पोलिस बँकेचे सीईओ डॉ. माने यांच्या केबिनमध्ये येऊन थांबले होते. पाऊण तास सोमय्या जिल्हा बँकेत होते. प्रथम त्यांनी सीईओ माने यांच्याशी चर्चा केली. यावेळी सोमय्या यांनी आपल्याकडे असणार्‍या मुश्रीफ यांच्याशी संबंधित बँकेच्या कागदपत्रांची खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांनी डॉ. माने यांना तपास यंत्रणेला सहकार्य करण्याबाबत सांगितले.

यानंतर बँकेच्या संचालकांनी सोमय्या यांची भेट घेतली. यामध्ये बँकेचे उपाध्यक्ष आ. राजूबाबा आवळे, संचालक ए. वाय. पाटील, भैया माने, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, श्रृतिका काटकर, सुधीर देसाई आदींचा समावेश होता. त्यांनी सोमय्या यांनी बँकेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आपण बँकेच्या कार्यपद्धती समजून घ्यावी, आपले गैरसमज दूर होतील. तसेच बँकेची होणारी बदनामी देखील थांबेल, असे सांगितल्याचे समजते. यावर सोमय्या यांनी बँकेच्या कारभाराबाबत आमचा आक्षेपच नसल्याचे संचालकांना सांगितले.

Back to top button