मुश्रीफ मित्रपरिवाराच्या एकाच कंपनीला 559 कोटींचे कर्ज : किरीट सोमय्या | पुढारी

मुश्रीफ मित्रपरिवाराच्या एकाच कंपनीला 559 कोटींचे कर्ज : किरीट सोमय्या

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या पाच हजार कोटी कर्जापैकी एक हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज मुश्रीफ व त्यांच्या कंपनी आणि मित्रपरिवाराला दिले आहे. त्यापैकी एकाच कंपनीस 559 कोटी कर्ज दिल्याचा नवीन आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केला.

ईडीमार्फत हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कोणतीही चौकशी ईडी करत नाही. केवळ मुश्रीफ यांचे जिल्हा बँकेतील व्यवहार ईडी तपासत आहे. मात्र मुश्रीफ हे जिल्हा बँकेची चौकशी सुरू असल्याचा कांगावा करून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा बँक भक्कमच आहे. त्यामुळे शेतकरी, ठेवीदार सभासद आणि कर्जदार यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. वेळ पडल्यास बँकेचे रक्षण आम्ही करू, अशा शब्दांत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.

संताजी घोरपडे कारखान्याचे शॉर्ट टर्म कर्ज मुश्रीफ यांनी अध्यक्षपदाचा गैरवापर करून लाँग टर्म करून घेतले आहे. यामुळे बँकेची बदनामी होत असल्याने मुश्रीफ यांनीच बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणीही सोमय्या यांनी केली.

कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या सोमय्या यांनी विभागीय सहकार निबंधक, जिल्हा बँक यांना भेटी दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातील काही शेतकरी समरजितसिंह घाटगे यांच्यासह मुंबईत येऊन भेटले. त्यामुळे शेतकर्‍यांना भेटण्यासाठी आपण पुन्हा कोल्हापुरात आलो असल्याचे सांगून सोमय्या पुढे म्हणाले, जिल्हा बँकेची चौकशी सुरू आहे, असा भ—म शेतकर्‍यांमध्ये निर्माण केला जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. ही चौकशी मुश्रीफ यांनी त्यांच्या मित्र परिवार व कंपन्यांची आहे. आपण जिल्हा बँकेच्या व्यवहाराबाबत कधीच तक्रार केली नव्हती.

आपली तक्रार ही मुश्रीफ यांनी जमा केलेली बेहिशेबी संपत्ती आणि त्यांनी केलेल्या दीडशे कोटींच्या घोटाळ्याबाबतची आहे. दीड वर्षापूर्वी केलेल्या तक्रारीवरूनच त्यांची आयकर व ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीची पाळेमुळे आता दूर जाऊ लागली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा बँकेतील मुश्रीफ यांच्या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. परंतु काही लोक जाणीवपूर्वक जिल्हा बँकेची चौकशी लावून बँकेची बदनामी आम्ही करत असल्याचा कांगावा करत आहेत. पण तो चुकीचा आहे. बँकेची संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. वेळ पडेल तेव्हा या बँकेच्या सरंक्षणासाठी आपण ठेवीदार, शेतकरी, संस्था यांच्या पाठीशी राहू.

पहिल्या 25 कर्जदारांची नावे जाहीर करावीत

आपण केलेल्या आरोपात तथ्य नसेल तर मुश्रीफ यांनी आपल्याविरुद्ध कोणताही दावा करावा. त्याला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत. आरोप खरे ठरल्यास मात्र त्यांनी शिक्षा भोगण्याची तयारी ठेवावी, असेही ते म्हणाले. जिल्हा बँकेने पहिल्या 25 कर्जदारांची नावे व कर्जाची रक्कम जाहीर करावी, असे आवाहन करत सोमय्या पुढे म्हणाले, जिल्हा बँकेने दिलेल्या 5 हजार कोटी कर्जापैकी एक हजार कोटीपेक्षा अधिक कर्ज मुश्रीफ व त्यांच्या कपंनी आणि मित्रपरिवाराला दिले आहे. त्यापैकी एकाच कंपनीस 559 कोटी कर्ज दिल्याचे कागदपत्र दाखवत ते पुढे म्हणाले, बँक आणि शेतकर्‍यांना पुढे करून मुश्रीफ बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आता ही कारवाई थांबणार नाही. यावेळी राहुल चिकोडे, सत्यजित कदम, भगवान काटे, सुनील कदम उपस्थित होते.

Back to top button