कोल्हापूरकरांनो सावधान… तापमान @ 36 | पुढारी

कोल्हापूरकरांनो सावधान... तापमान @ 36

कोल्हापूर, आशिष शिंदे : फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्यामुळे कोल्हापूरकर त्रस्त झाले आहेत. शहराचा पारा तब्बल 36 अंशांवर गेल्याने दिवसभर रखरखणारे उन थेट शरीरावर आघात करत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलेे.

गेल्या आठवडाभरापासून शहरामध्ये कमाल आणि किमान तापमानात दिवसागणिक वाढच होत आहे. कमाल तापमान आठवडाभरात 32 अंशांवरून तब्बल 36 अंशांवर आले आहे. किमान तापमानातही वाढ होत आहे. अशात निरभ्र आकाश असल्यामुळे उन्हाची प्रचंड तीव्रता जाणवत आहे.

उष्माघात ठरू शकतो जीवघेणा

उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक अथवा सनस्ट्रोक. वेळीच याच्यावर उपचार न घेतल्यास यामुळे जीव जाण्याचा धोकादेखील उद्भवू शकतो. कडक उन्हामध्ये फिरताना पाणी, क्षार यांच्यासह तरल पदार्थ कमी प्रमाणात घेतल्यास ही परिस्थिती उद्भवू शकते. लहान मुले, वृद्ध तसेच व्याधिग्रस्तांना उष्माघातचा प्रामुख्याने धोका असतो. यामुळे उन्हात फिरण्याचे टाळावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहण्यासाठी सतत पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय
तज्ज्ञ देतात.

…अशी घ्या काळजी

भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा प्रयत्न करा. दररोज किमान 8 ग्लास पाणी प्यावे. अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर करावा. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होईल. हलका व पौष्टिक आहार घ्यावा. सुती कपड्यांचा वापर करावा तसेच बराच वेळ उन्हात राहावे लागत असल्यास थोड्या थोड्या वेळांनी पाणी प्यावे. दुपारचे बाहेर जाणे टाळावे. उन्हात फिरताना टोपी, छत्री, स्कार्फ यांचा वापर करावा.

उष्माघाताची लक्षणे

चक्कर येणे, डोके दुखणे
गरम होऊनही घाम न येणे
त्वचा लालसर, कोरडी पडणे
थकवा, मळमळ, उलट्या
श्वास घेण्यास त्रास

Back to top button