Kolhapur : कोल्हापूरची उत्पादने जागतिक नकाशावर आणण्यासाठी सहकार्य | पुढारी

Kolhapur : कोल्हापूरची उत्पादने जागतिक नकाशावर आणण्यासाठी सहकार्य

शिरोली एमआयडीसी : पुढारी वृत्तसेवा :कोल्हापूर येथील उत्पादनांना जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाचे आंतरराष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी रॉब अँडरसन यांनी केले. ते शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर, स्मॅक व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी स्मॅक भवन शिरोली येथे आयोजित क्लीन टेक्नॉलॉजीस अॅण्ड एनर्जी एफिशियन्सी सिस्टिम्स (स्वच्छ तंत्रज्ञान आणि ऊर्जा कार्यक्षमता प्रणाली या विषयावर बोलत होते. (Kolhapur)

पाहुणचारासाठी कोल्हापूर ओळखले जाते आणि हे मी अनुभवले आहे. येथे येण्यापूर्वी मी सुरतला भेट दिली, त्यापेक्षा कोल्हापूरचा पाहुणचार चांगला होता, असेही ते म्हणाले. स्मॅकचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी स्वागत केले. त्यांनी परिसंवाद आयोजनामागील उद्देश व स्मॅकच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. स्मॅकच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रमुख अनिल वेल्दे, दूतावासाच्या सार्वजनिक सहभाग विशेषज्ञ अमृता डिमेल्लो यांची प्रमुख उपस्थित होती.

डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पर्यावरणाचे आणि कोल्हापूर शहर म्हणून सामायिक महत्त्वत्त याबद्दल विचार व्यक्त केले. जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूरचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अनिल वेलदे तसेच अमर जाधव, सचिन पाटील, वीरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांची ओळख एसईपी सदस्य हेमांग सोमय्या यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाल मंडलिक यांनी मानले. कार्यक्रमास स्मॅकचे उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, जयदीप चौगले, राजू पाटील, नीरज झंवर, अतुल पाटील, भरत जाधव, प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, रवी डोली आदी उपस्थित होते.

Back to top button