अमित शहा यांच्या दौर्‍यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा | पुढारी

अमित शहा यांच्या दौर्‍यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौर्‍यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे खात्रीलायक समजते. पुणे येथे शिवजयंती कार्यक्रमातून कोल्हापूरला येताना अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानातून कोल्हापुरात आले. त्यावेळी ही चर्चा झाल्याचे समजते.

शहा यांच्या दौर्‍यापूर्वी दोन दिवस अगोदरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता मिळाली. त्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्हही त्यांना मिळाले. आमदार अपात्रतेची सुनावणी मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार आहे. मात्र, पक्ष म्हणून मान्यता आणि चिन्ह मिळाल्यामुळे युती भक्कम झाल्याचे मानले जात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता योग्य वेळ असून, लोकसभा निवडणुकीसाठी आणखी वर्षभरात आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करून आणखी काही आमदारांना स्थान द्यायचे. मंत्रिमंडळात ज्यांना सामावून घेणे शक्य नाही, त्यांना वजनदार महामंडळे देऊन त्यांचे समाधान करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

पक्षाला ताकद देण्यासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना विभागीय तसेच जिल्हा समितीमध्ये स्थान देऊन त्यांनाही पक्ष कार्याला जुंपण्यासाठी सज्ज करण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुढील आठवड्यात हालचाली होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या नेत्यांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे आहे.

Back to top button