कोल्हापूर : योजनेतून आणि रुग्णांकडूनही पैसे! | पुढारी

कोल्हापूर : योजनेतून आणि रुग्णांकडूनही पैसे!

कोल्हापूर, डॅनियल काळे : गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करून त्यांना नवीसंजीवनी देण्यासाठी शासनाने महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजना सुरू केली; पण काही रुग्णालये योजनेतून पैसे घेतातच; पण त्यासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही पैसे घेतात.

रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांतही या योजनेतून उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णालयात योजनेची माहिती देणारा स्वतंत्र कक्ष तसेच आरोग्यमित्र लोकांच्या सेवेसाठी नेमले आहेत. 1,100 आजारांवर या योजनेतून उपचार होतात. संबंधित आजाराचा समावेश योजनेत असेल, तर रुग्णाची नोंदणी झाली की, तसा मेसेज मोबाईलवर येतो. त्यानंतर एका दिवसातच प्रकरण मंजूर केले जाते. मोबाईलवर प्रकरण मंजूर झाल्याचाही संदेश येतो. परंतु, एखाद्या रुग्णाला त्रास झाल्यानंतर ज्यावेळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते.

त्यावेळी अनेक आजार यामध्ये बसत असूनही रुग्णालये लवकर नोंदणी करत नाहीत. चार ते पाच दिवस मुद्दाम उशिरा नोंदणी केली जाते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून पहिल्या चार ते पाच दिवसांचे बिल आकारले जाते. नोंदणी केल्यानंतर महात्मा फुले योजनेतूनही संबंधित रुग्णालयाला पैसे मिळत असतात. एकाच रुग्णावर उपचार केलेले बिल दोघांकडून घेतले जात आहे; पण प्रत्येक जण तक्रार करायला पुढे येत नाही. त्यामुळे बर्‍याच जणांचे फावते.

Back to top button