‘पंचमहाभूत लोकोत्सवा’ने लोकचळवळ उभी राहील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

‘पंचमहाभूत लोकोत्सवा’ने लोकचळवळ उभी राहील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कणेरी मठाच्या वतीने आयोजित पंचमहाभूत लोकोत्सवाने पर्यावरण विषय समस्या निराकरणासाठी लोकचळवळ उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केला. सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात शोभायात्रा काढण्यात आली. त्याची सांगता पंचगंगा नदी घाटावर पंचगंगेची महाआरती करून झाली.

छत्रपती शिवरायांनी आग्र्‍याच्या ज्या ‘दिवाण-ए-आम’मध्ये औरंगजेबाला सडेतोड उत्तर दिले, त्याच ‘दिवाण-ए-आम’मध्ये शिवजयंती साजरी होत आहे. हा तमाम महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येक शिवप्रेमींसाठी भाग्याचा दिवस आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पंचगंगा घाटावर शिंदे यांच्या हस्ते पंचगंगेची महाआरती झाली. यावेळी कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार महेश शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, दीपाली सय्यद यांच्यासह विविध ठिकाणाहून आलेले स्वामी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, शनिवारी महाशिवरात्री झाली, आज शिवजयंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची जयंती सर्वत्र प्रचंड उत्साहात साजरी करत आहोत, आज आग्र्‍याच्या ‘दिवाण-ए-आम’मध्येही शिवजयंती साजरी होत आहे, हा सर्वांच्याच अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे.

कणेरी मठावर होणारा पंचमहाभूत लोकोत्सव हा न भूतो न भविष्यती असा होईल, असे सांगत शिंदे म्हणाले, यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेला इतकी गर्दी झाली की, आपल्यालाही चालत यावे लागले. काडसिद्धेश्वर स्वामी जे जे कार्य हातात घेतात, ते यशस्वी झाले आहे. आता या लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी राहील. नदीला माता मानण्याची भारतीय संस्कृतीची प्राचीन पुरातन परंपरा आहे. नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नदीची आरती करण्याची पद्धत संपूर्ण भारतात पाळली जाते. गंगा नदीच्या आरतीप्रमाणेच या ठिकाणी पंचगंगा नदी आरतीचे आयोजन केले. या ठिकाणी मंगलमय वातावरण निर्माण झाल्याचे सांगत या कार्यक्रमाद्वारे पाणी, ध्वनी प्रदूषण टाळूया, पाण्याच्या, ऊर्जेचा अतिरिक्त वापर टाळूया, गरजेपुरतेच वाहन वापरूया, माती आणि वृक्ष याचे संवर्धन करूया, असा संदेश देण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, या महोत्सवाला लोकांची उपस्थिती हेच या महोत्सवाचे मोठे वैशिष्ट्य ठरणार आहे. पर्यावरण संरक्षणाचा जागर या निमित्ताने होणार आहे. यामुळे या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहनही त्यांनी केले. बडोदा येथील स्वामी त्याग वल्लभजी म्हणाले, या महोत्सवातून प्रत्येकजण पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन जाणार आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. येत्या काही दिवसांत तो विक्राळ रूप धारण करू शकतो. यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. त्यासाठी केवळ या परिसरातच नव्हे तर संपूर्ण जगभर जनजागृतीची सुरवात कणेरी मठावरील या महोत्सवाने होणार आहे.

महाआरती झाल्यानंतर व्यासपीठावर प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. यानंतर आग्रा येथील पूर्वनियोजित दौर्‍यासाठी जाणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री केसरकर विमानतळाकडे रवाना झाले. यानंतर व्यासपीठावर देशभरातील विविध प्रांतातून आलेल्या कलाकारांनी विविध कलाप्रकार, वाद्य वादन, नृत्य आदी कार्यक्रमांचे सादरीकरण झाले.

यावेळी शंकरारूढ स्वामी, योगी चरण आदी देशभरातून आलेल्या स्वामींसह संयोजन समितीचे संतोष पाटील, उदय सावंत, डॉ. संदीप पाटील, उदय पाटील, माणिक-पाटील चुयेकर, जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदी उपस्थित होते.

गांधी मैैदान येथून काढलेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले. शुक्रवार पेठ पोलिस चौकी ते पंचगंगा घाटापर्यंत मुख्यमंत्री शिंदे चालत आले. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीतून शिंदे यांना पुढे नेताना सुरक्षा यंत्रणेची अक्षरश: दमछाक झाली. काही ठिकाणी चेंगराचेंगरीही झाली. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या लोकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

Back to top button