जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव वधारणार! | पुढारी

जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव वधारणार!

कोल्हापूर; राजेंद्र जोशी :  भारत आणि युरोपियन युनियनमध्ये साखरेच्या उत्पादनामध्ये यंदा घट वर्तविली जात आहे. यामुळे जागतिक बाजारात साखरेचे भाव आगामी काही काळासाठी चढे राहण्याचे संकेत मिळाले आहेत. जागतिक वायदे बाजारात मार्च महिन्याच्या वायद्यासाठी कच्च्या साखरेला प्रतिपाऊंड 11 ते 22 सेंटपर्यंत (प्रतिटन 33 हजार 75 ते 40 हजार375 रुपये) इतकी बोली गेल्यामुळे नजीकच्या काळात जागतिक बाजारात साखरेला मोठी तेजी राहील, असे अनुमान जागतिक स्तरावर पतमापन आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या संस्थानी काढले आहे.

भारतात चालूवर्षी पावसाच्या अनियमिततेने आणि काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने दर हेक्टरी उत्पादनात घट झाली आहे. गतवर्षी देशामध्ये 390 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. यापैकी 32 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविल्यानंतर साखरेचे निव्वळ उत्पादन 358 लाख मेट्रिक टन झाले. चालूवर्षी मुळातच साखर उत्पादनाचा अंदाज 385 लाख मेट्रिक टन वर्तविला गेला आणि 45 लाख मेट्रिक टन साखरेचा इथेनॉल उत्पादनासाठी होणारा वापर लक्षात घेता, साखर उत्पादन 340 लाख मेट्रिक टनावर स्थिरावेल, असा दुसरा सुधारित अंदाज इस्माने व्यक्त केला असला, तरी प्रत्यक्ष उत्पादन त्याहून कमी होईल, असा अंदाज आहे. या उत्पादनामुळे भारताने साखर निर्यात कोट्यावर निर्बंध आणले. याचा परिणाम जागतिक बाजारात दिसतो आहे.

निर्यात कोटा वाढविण्याची कारखानदारांची मागणी

साखरेच्या उत्पादनातील अपेक्षित घट लक्षात घेऊन केंद्र सरकारने चालू वर्षात साखर निर्यातीवर निर्बंध जाहीर केले आहेत. गतवर्षी 110 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करणार्‍या भारतीय कारखानदारीला शासनाने यंदा अवघ्या 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीची परवानगी दिली आहे. 31 मार्च 2023 पर्यंत यातील बहुतांश साखरेची निर्यात होईल, अशी स्थिती आहे. या स्थितीत जागतिक बाजारातील चढ्या भावाचा लाभ उठविण्यासाठी भारतीय साखर कारखानदारीतून निर्यात कोटा वाढविण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकर यावर सकारात्मक विचारही करत आहे.

Back to top button