दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात मंगळवारपासून कलम 144 लागू | पुढारी

दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात मंगळवारपासून कलम 144 लागू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दहावी व बारावी परीक्षा केंद्रांच्या आवारात व परिसरात मंगळवारपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. दि. 21 फेब—ुवारीपासून दि. 25 मार्च या कालावधीत ज्या दिवशी पेपर असतील, त्या दिवशी या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

अंमलबजावणी कालावधीत सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत, सी.आर.पी.सी. 1973 मधील कलम 144 अन्वये मोबाईल फोन व त्यासंबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास, वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास बंदी आहे. कॉपीमुक्त परीक्षा आणि कामकाज सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी हा आदेश लागू केला आहे.

आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणार्‍या उपकरणांसाठी लागू राहणार नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

Back to top button