Crypto investment : ‘क्रिप्टो’ गुंतवणुकीच्या नावाखाली डॉक्सी कंपनीकडून ७४ लाखांची फसवणूक | पुढारी

Crypto investment : 'क्रिप्टो' गुंतवणुकीच्या नावाखाली डॉक्सी कंपनीकडून ७४ लाखांची फसवणूक

गांधीनगर : पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीवर दिवसाला अर्धा ते एक टक्का व्याजाच्या आमिषाने क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकदारांची ७४ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी डॉक्सी कंपनीच्या सहाजणांविरोधात गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गांधीनगर, इचलकरंजी येथील ३६ जणांची लाखो रुपयांची रक्कम अडकली असून, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे. यात यामध्ये गांधीनगर, इचलकरंजी येथील ३६ जणांची लाखो रुपयांची रक्कम अडकली असून, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे. यात हरियाणा, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली व मुंबई येथील संशयितांचा सहभाग असावा, असे पोलिसांनी सांगितले. ( Crypto investment )

याप्रकरणी डॉक्सी कंपनीचा प्रमोटर राजेश ओमप्रकाश कपूर, सुरेंद्र अंतिल (रा. सोनिपत, हरियाणा), स्वरूप गोवर्धन दत्ता (रा. पश्चिम बंगाल), कंपनीचा ग्लोबल को-ऑर्डिनेटर अलेक्झांडर गुरमित अजयसिंह (रा. मंडे मार्केट, नवी दिल्ली) व स्पेश लालजी राय (रा. साईनिष्ठसोसायटी, नवी मुंबई), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत स्वप्निल सूर्यकांत पोरे (रा. उजळाईवाडी) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी पोरे हे कापड व्यापारी आहेत. एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या मोबाईलवर डॉक्सी कंपनीच्या वेबसाईटवरून गुंतवणुकीची माहिती मिळाली. गुंतवणुकीवर दिवसाला ०.४ ते १ टक्का व्याजाचे आमिष दाखवले. ही गुंतवणूक डॉलरमध्ये करावी लागेल, असे सांगण्यात आले. यानंतर दहा दिवसांनी पोरे यांच्या मोबाईलवर संदेश पाठवून शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गुंतवणुकीची माहिती घेण्याबाबत आयोजित बैठकीसाठी बोलावले.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे माहिती

एप्रिल २०२२ मध्ये कोल्हापुरात झालेल्या बैठकीला अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते. कंपनीकडून सुरेंद्र अंतिल व राजेश कपूर या दोघांनी कंपनीत गुंतवणुकीचे विविध प्लॅन उपस्थितांना सांगितले. यानंतर त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पश्चिम बंगालचा स्वरूप दत्ता व अॅलेक्झांडर यांच्याशी ओळख करून दिली.

 Crypto investment : महामार्गावर बोलावून स्वीकारले पैसे

फिर्यादी पोरे यांना महामार्गालगत बोलावून सुरेंद्र अंतिल याने ४ लाख २५ हजार रुपये स्वीकारले. यानंतर अंतिल याने ही रक्कम डिजिटल डॉलरमध्ये बदलून ५ हजार डॉलरची रक्कम डॉक्सी कंपनीने दिलेल्या आयडीवर आल्याचे भासवले. ८५ रुपये डॉलरची किंमतही त्यांना सांगण्यात आली. तसेच डॉक्सी कॉईनचा दर ४ डॉलरच्या आसपास असून, भारतीय चलनात याची किंमत ३४० रुपये असल्याचे सांगितले. अशाच पद्धतीने जुलै २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत पोरे यांच्या खात्यांतून १ लाख ३४ हजार २१५ रुपयांचे ६२ डॉक्सी कंपनीचे कॉईन डिजिटल वॉलेटमध्ये असल्याचे भासविण्यात आले.

ऑक्टोबरनंतर झूम मिटिंग बंद

जिल्ह्यातील गुंतवणूकदारांसोबत डॉक्सी कंपनीचे प्रमोटर परराज्यांतून झूम मिटिंगद्वारे संपर्कात होते. कंपनीमध्ये झालेली गुंतवणूक डिजिटल वॉलेटमध्ये दिसते; पण ती काढता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नियमित होणारी झूम मिटिंगही अचानक बंद करण्यात आली. डिसेंबर २०२२ पासून व्यवहार सुरळीत होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप काहीच होऊ शकलेले नाही. गुंतवणूकदारांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली..

 Crypto investment : गुन्ह्याबाबत माहितीच नाही?

जिल्ह्यात डॉक्सी कंपनीकडून फसवणूक झाल्याची फिर्याद ७ फेब्रुवारीला गांधीनगर पोलिसांत दाखल झाली होती. गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. दाखल गुन्हा व तपासाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे विचारणा केली असता याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button