कोल्हापूर : शस्त्र तस्करीच्या चौकशीतून गोकाक येथील व्यापार्‍याच्या खुनाचा उलगडा | पुढारी

कोल्हापूर : शस्त्र तस्करीच्या चौकशीतून गोकाक येथील व्यापार्‍याच्या खुनाचा उलगडा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गावठी बनावटीच्या शस्त्र तस्करीच्या चौकशीतून गोकाक (जि. बेळगाव) येथील व्यापारी राजेश सत्यनारायण झंवर (53) यांची सुपारी देऊन केलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. रोहितराज लक्ष्मण भोसले (25, रा. नागाळा पार्क), अरबाज सिकंदर मुल्ला (25, आंबेवाडी, ता. करवीर), शफात इर्शादअहमंद तरासगर (24, लकड गल्ली मोहल्ला, गोकाक) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

गोकाक येथील डॉक्टर सचिन शिरगावी याने व्यापारी झंवर यांचा आर्थिक वादातून काटा काढण्यासाठी सूत्रधार शफात तरासगरला सुपारी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीची दोन पिस्तूल, मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

तरासगरने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने झंवर यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोकाकमधील कोळवी कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे उघडकीला आल्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.

आंबेवाडी रस्त्यावर कारवाई

रोहितराज भोसले याच्या ताब्यात गावठी बनावटीचे पिस्तूल असून तो तस्करी करीत असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल दीपक घोरपडे यांना मिळाली. आंबेवाडी-वडणगे रोडवरील शेळीपालन फार्मजवळ भोसले शस्त्र तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक शेषराज मोरे, घोरपडे, रणजित कांबळे आदींनी सापळा रचून भोसलेसह त्याचा साथीदार अरबाज मुल्ला या दोघांना ताब्यात घेतले.

संशयितांकडून खुनाची कबुली

त्यांच्याकडे 50 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल पोलिसांना मिळाले. चौकशीतून त्यांनी आणखी एक पिस्तूल डॉ. शिरगावी यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. शिरगावी यांच्याकडील पिस्तूल शफात तरासगर याच्या ताब्यात असल्याची माहिती देण्यात आली.
त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तरासगर याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने शस्त्र तस्करीसह डॉ. शिरगावी यांच्या सांगण्यावरून व्यावसायिक झंवर यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

ओळखीतून विश्वासघात

व्यापारी झंवर, डॉ. शिरगावी व संशयित शफात तरासगर हे तिघेही मूळचे गोकाकचे असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी (दि. 10) रात्री साडेआठला तिघेही गोकाक येथील योगीकोडा येथे गेले. त्याठिकाणी संशयिताने धारदार शस्त्राने व्यापारी झंवर यांच्या पोटावर, छातीवर,पाठीवर वर्मी वार केले.

मृत्यूची खात्री होताच मृतदेह कालव्यात फेकला

शरीरावर झालेल्या खोलवर हल्ल्यानंतर रक्तस्राव होऊन झंवर याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कोळवी कालव्यात फेकून देण्यात आल्याची कबुलीही संशयित तरासगर याने दिली. त्यामुळे खुनाला वाचा फुटल्याचे महादेव वाघमोडे यांनी सांगितले. डॉ. शिरगावी व झंवर यांच्यातील आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचेही चौकशीत निष्पन्न झाल्याचे ते म्हणाले.

Back to top button