कोल्हापूर : कारागृहांवर आता ‘तिसर्‍या डोळ्या’ची नजर | पुढारी

कोल्हापूर : कारागृहांवर आता ‘तिसर्‍या डोळ्या’ची नजर

कोल्हापूर, आशिष शिंदे : कारागृहांत कैद्यांमध्ये होणार्‍या हाणामार्‍या, परस्परविरोधी टोळी युद्धातून उभारणारा संघर्ष, कारागृहातील शेतीत काम करताना होणारे वाद आणि पळून जाण्यासाठी शोधल्या जाणार्‍या संधी. यावर उपाय म्हणून आता राज्यातील सर्वच कारागृहांवर ‘तिसर्‍या डोळ्या’ची म्हणजेच ड्रोन कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. त्याचबरोबर कारागृहांत येणार्‍या सर्व साहित्याची आणि अधिकारी व कर्मचार्‍यांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी विमानतळावर असते त्या धर्तीवर एक्स-रे बॅगेज स्कॅनिंग सिस्टीम तैनात केली जाणार आहे.

मुळातच कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये थोड्या फार फरकाने हीच स्थिती आहे. पूर्वीच्या काळी गावाबाहेर असणारी कारागृहे आता वाढत्या शहरीकरणामुळे भर वस्तीत आली आहेत. मुंबईचे आर्थर रोड, पुण्याचे येरवडा व कोल्हापूरचे कळंबा ही कारागृहे त्याची काही उदाहरणे आहेत. कारागृहे मध्यवस्तीत आल्याने कैद्यांवर नजर ठेवणे हे अधिक कठीण होत आहे. सुरक्षा यंत्रणा धाब्यावर बसवून मोबाईलसह अमली पदार्थांचा होणारा वापर हा अनेक कारवाईंतून समोर आला आहे.

यामुळे कारागृहांची सुरक्षा व्यवस्थाच धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता सुरक्षा व्यवस्थेला दिले जाणारे आव्हान मोडून काढण्यासाठी सरकारने सुरक्षेला तांत्रिक जोड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कारागृहांवर आता ड्रोनची नजर राहणार आहे. शेतीसह अन्य कामे कैदी करतात. कैद्यांच्या तुलनेत सुरक्षा रक्षकांची संख्या नेहमीच अपुरी असते. त्यामुळे ड्रोनच्या साहाय्याने त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारागृहातील नियंत्रण कक्ष सज्ज केले जाणार आहेत.

कारागृहांत येणार्‍या साहित्याची होणार तपासणी

कारागृहांत येणार्‍या मोबाईलसह अमली पदार्थांच्या वस्तूंना आळा घालण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांसह अभ्यागतांची स्वयंचलित एक्स-रे बॅगेज स्कॅनर सिस्टीमद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने 3 कोटी 74 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Back to top button