सिद्धगिरी मठ : गावागावांतून दररोज येणार चार लाख भाकरी | पुढारी

सिद्धगिरी मठ : गावागावांतून दररोज येणार चार लाख भाकरी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा :सिद्धगिरी मठ महासंस्थानच्या वतीने आयोजित सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवासाठी दि. 20 ते दि. 26 या कालावधीत गावागावांतून दररोज चार लाख भाकरी येणार आहेत. हा लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी केलेल्या विविध आवाहनांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकसहभागातून हा पंचमहाभूत लोकोत्सव खर्‍या अर्थाने ‘सुमंगल’ होणार आहे.

एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावागावांतून शिधा जमा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. उत्सव काळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे नियोजन झाले आहे. बाहेरून आलेले साधुसंत, भक्तगण यांना परिसरातील घराघरांत राहण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

दि. 20 ते दि. 26 फेब—ुवारीदरम्यान होणारा पंचमहाभूत महोत्सव खर्‍या अर्थाने लोकोत्सव व्हावा, यासाठी गेले दोन महिने विविध उपक्रम सुरू आहेत. महोत्सवाचे संयोजन कणेरी सिद्धगिरी मठ महासंस्थान करत असले तरी संयोजनातील घटक मात्र केवळ परिसरातील ग्रामस्थच नव्हे, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकसह विविध राज्यांतील भक्तगण आहेत. महोत्सवादरम्यान कोणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली आहे.

रोज पाच लाखांवर लोकांना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रावळ्या अथवा प्लास्टिक वापरले जाणार नाही. यामुळे भक्तांनी ताट-वाटी आणि तांब्या द्यावे, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार मठावर रोज शेकडो ताट-वाट्या येत आहेत. सुशोभीकरणासाठी जुन्या साड्यांचा वापर करण्यात येत आहे. यासाठी महिलांकडून रोज हजारो साड्या दिल्या जात आहेत.

आलेल्या लोकांना रोज काय जेवण द्यायचे, त्यामध्ये आपण कोणता पदार्थ द्यायचा याचा निर्णय गावागावांनी घेतला आहे. याशिवाय प्रत्येक घरातून सात दिवस चार ते पाच लाख भाकरी येणार आहेत. सध्या शिधाही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.

या उत्सवासाठी पंचवीस राज्यांतून भक्तगण येणार आहेत. त्यातील बहुतांश लोकांच्या राहण्याची सोय परिसरातील गावांत असलेल्या घराघरांत करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. मठावर प्लास्टिक कचर्‍याचे विघटन करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकांनी एक किलो कचरा आणावा असे आवाहन केले आहे. महोत्सव काळात परिसरात मोठी गर्दी होणार असल्याने रस्ते रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी अनेकांनी आपली जमीन दिली आहे. पार्किंगसाठी परिसरातील शेतकर्‍यांनी आपले शेत मोकळे करून दिले आहे.

Back to top button