’जिल्हा मध्यवर्ती बँकेत मुश्रीफांचा 156 कोटींचा आणखी एक घोटाळा’ | पुढारी

’जिल्हा मध्यवर्ती बँकेत मुश्रीफांचा 156 कोटींचा आणखी एक घोटाळा'

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेत आ. हसन मुश्रीफ यांनी 156 कोटी रुपयांचा आणखी एक घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी केला. याबाबतचे ट्विट करत ‘मुश्रीफ, जवाब देना होगा’ असे म्हणत त्यांना पुन्हा आव्हान दिले.

सोमय्या यांच्या तक्रारीवरून मुश्रीफ यांच्या मागे ईडीची साडेसाती सुरू झाली आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. त्यानंतर मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेलाही ईडीने सोडले नाही. बँकेवर छापेमारी करत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह पाच अधिकार्‍यांनाही ताब्यात घेतले. मुंबईत नेऊन त्यांची एक दिवस चौकशीही केली होती.

या सर्व घडामोडी ताज्या असतानाच सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढविला आहे. मुश्रीफ यांनी स्वत:च्या परिवारातील सदस्यांच्या ब्रिस्क फॅसिलिटीज या कंपनीला 156 कोटी रुपयांचे कर्ज दिले. हे कर्ज एनपीएत गेले. त्यानंतर मुश्रीफ यांनी हे कर्ज अधिकारी व कर्मचार्‍यांना हाताशी धरून मागील तारखांच्या नोंदी घालून ‘अ‍ॅडजेस्ट’ केले. बँकेचे अध्यक्ष म्हणून मुश्रीफ यांनी परवानगी नसतानाही या कर्जाची समायोजित पुनर्रचना केली. मुश्रीफ यांनी बँक प्रशासनाच्या संगनमताने लूट केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.

Back to top button