कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या वसुलीला गती | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या वसुलीला गती

कोल्हापूर; विकास कांबळे :  शासनाच्या निर्बंधांमुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या घरफाळा व पाणीपट्टी वसुलीला आता गती आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी 61 टक्के वसुली केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीत 11 टक्के वाढ झाली आहे.

ग्रामपंचायत हद्दीमध्ये अजूनही बहुतांश ठिकाणी पाणीपट्टीची रक्कम वार्षिक आकारली जाते. आता काही गावांनी मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. या पाणीपट्टी व घरफाळाच्या वसुलीला डिसेंबरपासून खर्‍या अर्थाने सुरुवात होते. यानंतर शेतकर्‍यांच्या उसाची बिले जमा होत असतात. कोरोनामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून वसुलीला मर्यादा आल्या होत्या. मार्चपर्यंत 70 टक्क्यांच्या वर कोणाची वसुली झाली नव्हती. आता मात्र वसुलीच्या रकमेत वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी घरफाळा केवळ 52.87 टक्के वसूल झाला होता. यावेळी डिसेंबरअखेर 64 टक्के वसुली झाली आहे. पाणीपट्टीची 54.29 टक्के इतकी वसुली झाली होती. यावेळी 64 टक्के वसुली झाली आहे. मार्च अखेरपर्यंत यावर्षीची वसुली 90 टक्यांच्या जवळपास जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 66 कोटी घरफाळा व 31 कोटी रुपये पाणीपट्टी वसूल झाली होती. यावर्षी 80 कोटींच्या वर घरफाळा व 38 कोटी पाणीपट्टीची वसुली झाली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुलीत करवीर व हातकणंगले तालुका आघाडीवर आहे. हातकणंगले तालुक्यातील घरफाळा वसुलीची टक्केवारी 74.92 टक्के आहे. करवीर तालुक्यातील पाणीपट्टीची वसुली 72.66 टक्के इतकी आहे.

Back to top button