

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या राजकारणात आ. पी. एन. पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके हे शुक्रवारी एकत्र आले. कोल्हापुरात शाहूपुरीतील बँकेत त्यांची बैठक झाली. यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके उपस्थित होते. विधानसभा, लोकसभेसह यापुढील सर्व निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे करवीरमधील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
काही वर्षांपूर्वी आ. पाटील व नरके एकत्र होते. मात्र त्यांच्यात राजकीय वैर निर्माण झाले. सद्यस्थितीत दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक होते. करवीर विधानसभा मतदारसंघात नरके हे पुतण्या माजी आ. चंद्रदीप नरके यांच्यासोबत होते. दरम्यान, पूर्वीप्रमाणेच जिल्ह्याच्या राजकारणात आता माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि आ. पी. एन. पाटील यांची 'मनपा' आघाडी दिसणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सध्या कुंभी कासारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे. कारखान्याच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांच्या सत्तारूढ नरके पॅनेलच्याविरोधात आ. पी. एन. पाटील यांच्या पाठिंब्याने विरोधी पॅनेल निवडणूक मैदानात उतरले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. त्यातच आता पी. एन. पाटील आणि अरुण नरके यांनी जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एक होण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघात आता अरुण नरके यांची साथ पुतण्या चंद्रदीप नरके यांच्याऐवजी आ. पी. एन. पाटील यांना राहणार आहे. त्याबरोबरच चेतन नरके यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांनी अद्याप कोणत्या पक्षातून लढायचे हे निश्चित केलेले नाही. मात्र आ. पी. एन. हे नरके यांना पाठिंबा देतील. एकूणच आ. पी. एन. पाटील व नरके एकत्र आल्याने माजी आ. चंद्रदीप नरके यांच्यासमोर त्यांचे आव्हान असेल.